म्हापशात हटवलेल्या झोपड्या पुन्हा राहताहेत उभ्या

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील परिसरात कार्वाल्हो पेट्रोल पंपाजवळ म्हापसा नगरपाललिकेच्या अशीर्वादाने गेल्या तीन वर्षांपासून परप्रातीयांच्या झोपड्या पुन्हा उभ्या राहत आहेत.

म्हापसा: म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील परिसरात कार्वाल्हो पेट्रोल पंपाजवळ म्हापसा नगरपाललिकेच्या अशीर्वादाने गेल्या तीन वर्षांपासून परप्रातीयांच्या झोपड्या पुन्हा उभ्या राहत आहेत.

या झोपड्यांसदर्भात कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने केल्यानंतर त्या झोपड्या हटवण्याचा सोपस्कार म्हापसा पालिकेकडून केला जातो. परंतु, दुसऱ्याच दिवशी त्या झोपड्या पुन्हा उभारल्या जातात. त्यानंतर मात्र म्हापसा पालिका त्या झोपड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा पुन्हा तक्रारी करेपर्यंत कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

सामाजिक कार्यकर्ता शेखर नाईक म्हणाले, म्हापशात हटवलेल्या झोपड्या पुन्हा उभ्या राहण्यास राजकारणीच जबाबदारी आहेत. कारण, त्यांना स्वत:ची मतपेढी मजबूत करायची आहेत. त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे आधार कार्डेही आहेत. त्या परिसरात उद्धटपणा करणाऱ्या त्यांचा मुकादमही गोव्याबाहेरीलच आहे. त्यांच्या आधारकार्डवर वास्कोतील पत्ता नमूद केलेला आहे. तथापि, वास्कोत त्यासंदर्भात शोध घेतला असता त्या पत्त्यावर कुणाही व्यक्तीचे वास्तव्य नाही असे आढळून आले आहे. त्यामुळे ती आधार कार्डे बोगस ठरतात, असा दावा श्री. नाईक यांनी केला.

म्हापशात वास्तव्य असलेले हे झोपडपट्टीवासीय बाजूच्या ओहोळातील दुर्गंधीयुक्त पाण्यात आंघोळ करतात. तसेच स्वत:चे कपडेही त्याच ओहोळाच्या पाण्यात धुतात. याबाबत म्हापशातील आरोग्याधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याचा दावा शेखर नाईक व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी काही लोकांनी दगड मारून सार्वजनिक पाइपलाइन तोडली असून, त्या तुटलेल्या जलवाहिनीतून झिरपणाऱ्या पाण्याचा ती मंडळी पिण्यासाठी वापर करीत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे म्हापशातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे, असा दावाही त्यांनी केला.

कार्वाल्हो पेट्रोल पंपाच्या जवळच्या परिसरात सध्या गेल्या तीन वर्षांपासून पाच-सहा झोपड्या कायमस्वरूपी आहेत. त्याशिवाय, म्हापशातील नियोजित नवीन बसस्थानकावर सात-आठ झोपड्या आहेत. लोकांनी आग्रहपूर्वक मागणी केल्यानंतरच त्या झोपड्या हटवल्या जातात. अर्थांत कारवाई झाल्यानंतर केवळ एक-दोन दिवस त्या ठिकाणी झोपड्या नसतात.

या झोपड्यांमुळे म्हापसा शहर परिसर विद्रूप होत असतो; परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचे कोणतेही सोयरसूतक नाही. तसेच, या झोपड्यांच्या परिसरात विशेषत: रात्रीच्या वेळी काही परप्रांतीय लोक मद्यप्राशन करून मोठमोठ्याने भांडत असतात, अशाही तक्रारी आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना यासंदर्भात जाब विचारला असता ‘हम जियेंगे यहाँ और मरेंगे भी यहाँ’ असे ते बिनदिक्कतपणे सांगत असतात. आता ते मोडकी-तोडकी कोकणी भाषाही बोलत आहेत.

संबंधित बातम्या