हैदराबादची नजर तिसऱ्या क्रमांकावर- चेन्नईशी गाठ; एटीके मोहन बागानला केरळा ब्लास्टर्सचे आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात साखळी फेरीतील बाकी सामने प्ले-ऑफ फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात साखळी फेरीतील बाकी सामने प्ले-ऑफ फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. साहजिकच प्रत्येक संघ पहिल्या चार संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. रविवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध खेळताना हैदराबाद एफसीची नजर तिसऱ्या क्रमांकावर असेल. हैदराबाद व चेन्नईयीन यांच्यातील सामना वास्को येथील टिळक मैदानावर होईल. डबल हेडरमधील दुसऱ्या लढतीत फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एटीके मोहन बागानसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान असेल.

ईस्ट बंगालने पिछाडीवरून रोखले; बेदियास रेड कार्ड

गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एफसी गोवा (21 गुण) संघापेक्षा हैदराबाद एफसीचे सध्या दोन गुण कमी आहेत. चेन्नईयीनला नमविल्यास, पूर्ण तीन गुणांसह अव्वल स्थानावरील मुंबई सिटी आणि दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागान यांच्यानंतर मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघास स्थान मिळू शकेल. त्याचवेळी गतउपविजेते चेन्नईयीन एफसीही प्ले-ऑफ फेरीसाठी इच्छुक आहेत. सध्या त्यांच्या खाती 16 गुण आहेत. साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीनने मागील लढतीत मातब्बर मुंबई सिटीस गोलबरोबरीत रोखले होते. हैदराबाद संघ सहा सामने अपराजित आहे, त्यात दोन विजय व सलग चार बरोबरींचा समावेश आहे.

फॉर्मच्या शोधात...

स्पर्धेतील आठ सामन्यात गोल न स्वीकारलेला एटीके मोहन बागान संघ सध्या फॉर्मच्या शोधात आहे. मागील चार लढतीतून त्यांना फक्त चार गुणांचीच कमाई करता आली आहे. गतसामन्यात त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडकडून पराभव पत्करावा लागला होता. सध्या 24 गुण असलेला अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ रविवारी पूर्ण तीन गुण मिळवून दुसरे स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने प्रगती साधताना मागील पाच लढतीत पराभव स्वीकारलेला नाही. दोन विजय व तीन बरोबरी या अपराजित कामगिरीत कामगिरीत ते आणखी भर टाकू शकतात. सध्या त्यांचे 15 गुण आहेत. स्पर्धेत सर्वाधिक 22 गोल स्वीकारलेल्या या संघास बचावावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

 

दृष्टिक्षेपात कामगिरी...

- हैदराबाद एफसी : 14 सामने, 4 विजय, 7 बरोबरी, 3 पराभव, 19 गुण

- चेन्नईयीन एफसी : 14 सामने, 3 विजय, 7 बरोबरी, 4 पराभव, 16 गुण

- एटीके मोहन बागान : 13 सामने, 7 विजय, 3 बरोबरी, 3 पराभव, 24 गुण

- केरळा ब्लास्टर्स : 14 सामने, 3 विजय, 6 बरोबरी, 5 पराभव, 15 गुण

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे हैदराबादची चेन्नईयीनवर 4-1 फरकाने मात

- सातव्या मोसमातील पहिल्याच लढतीत बांबोळी येथे एटीके मोहन बागानचा केरळा ब्लास्टर्सवर 1-0 फरकाने विजय

संबंधित बातम्या