शालेय शिक्षणात स्वच्छतेचाही धडा

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियमांचेही मार्गदर्शन

पणजी

शालेय शिक्षणात प्रत्येक वर्गासाठी एक धडा स्वच्छतेसंदर्भातील अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. कोविड महामारीच्या काळात वैयक्तिक स्वच्छतेला कमालीचे महत्त्व आल्याने त्याविषयी शालेय जीवनातच शिस्त लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
‘स्वच्छता’ हा नवा विषय म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट न करता प्रत्येक वर्गाला एक धडा याविषयी समाविष्ट केला जाणार आहे. गोवा शिक्षण विकास महामंडळाकडून असे शिक्षण दिले जावे, अशी शिफारस शिक्षण खात्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार यंदाच्या शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता याविषयी शिक्षण देण्याचे ठरवण्यात आले आहे. या शिक्षणासाठी राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषदेनेही आवश्यक ती तयारी केली आहे. कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियम आदींचे शिक्षणही यासोबत देण्यात येणार आहे.
कोविड महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातील या बदलाविषयी शाळांना अद्याप काही कळवण्यात आलेले नाही. मात्र येत्या काही दिवसात त्याविषयी शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी केले जाऊ शकते. हे शिक्षण देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १०८ शाळांत पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला होता. हा विषय स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जात होता. मात्र आता हा विषय सर्वच शाळांना लागू करण्याचे ठरवण्यात आले आहे. मात्र वेळेअभावी स्वतंत्र विषयाऐवजी एक वा दोन धडे असलेल्या विषयांत समाविष्ट करण्याचे ठरवण्यात आले आहे. कोविड महामारीमुळे स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्यासाठी तातडीने हे पाऊल टाकण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
तिसरी व चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशी तीन टप्प्यांत हा विषय शिकवला जाणार आहे. शारीरिक शिक्षण, विज्ञान आणि समाजविज्ञान या विषयांत हे धडे समाविष्ट केले जाणार आहेत. तसा अभ्यासक्रम तयार आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती शाळा पुन्हा सुरू होण्याची.

संबंधित बातम्या