मी स्वाभिमानी काँग्रेसमन: रेजिनाल्ड लॉरेन्स

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

आपल्याच पक्षात आपल्यास बाजुला सारले जात असल्याची, एकटे पाडले जात असल्याची काँग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांची भावना बनली असून त्यांनी पक्षातच आपली वेगळी चूल मांडली आहे.

मडगाव : आपल्याच पक्षात आपल्यास बाजुला सारले जात असल्याची, एकटे पाडले जात असल्याची काँग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांची भावना बनली असून त्यांनी पक्षातच आपली वेगळी चूल मांडली आहे. पक्षातच असले तरी ‘एकला चलो रे’चा नारा लावून ते सर्वांपासून अलग राहात आहेत. रविवारी चांदर येथे झालेल्या कोळसा विरोधी आंदोलनातही ते काँग्रेस नेत्यांपासून अलग राहून स्वतंत्रपणे सहभागी झाले होते. 

आपण काँग्रेस पक्षाकडे एकनिष्ठ आहे, पण पक्षातील नेत्यांकडून आपल्याविरुद्ध कारस्थाने रचली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘पक्षाच्या नेत्यांकडून मला अपमानास्पद वागणूक दिली जाते. २००७ पासून मी काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेससाठी मी खूप काही केले आहे. मला नोकरासारख  वागवू नका’ असा इशारा रेजिनाल्ड यांनी दिला.

माझ्या विरोधात बोलत असलेल्या नेत्यांसोबत मी कसा काय राहू शकतो. म्हणून रविवारी चांदर येथील आंदोलनात मी स्वतंत्रपणे सहभागी झालो. कोळसाविरोधी आंदोलन हे जनतेचे आहे. तिथे पक्षाच्या बॅनरची गरज नाही. आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. मी आधीपासूनच कोळसा व रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात प्रखर भूमिका घेतली आहे, असे रेजिनाल्ड यांनी स्पष्ट केले. 

माझे राजकीय वैरी फ्रान्सिस सार्दीन यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत मी प्रचार केला होता. पक्षाचे हित लक्षात घेऊन मी काम केले होते. तेही माझ्या विरोधात कुडतरी मतदारसंघात वावरत आहेत. माझ्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे कागाळ्या केल्या जात आहेत. भाजपकडून पाठिंबा घेतलेले लोक माझ्या विरोधात पक्ष कार्यालयात बोलतात आणि पक्षाचे नेते या नेत्यांना रोखत नाहीत. माझ्याबद्दल या नेत्यांना असुया वाटत असावी, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले. 

मी स्वाभिमानी काँग्रेसमन
मी स्वाभिमानी काँग्रेसमन आहे. मला इतर पक्षाकडून ऑफर येत आहेत. दहा आमदार भाजपमध्ये गेले तेव्हाही मला ऑफर होती. मी अन्य पक्षात जाणार नाही. काँग्रेसमध्येच मी इतर नेत्यांपासून अलग राहून माझे कार्य करत राहीन, असे त्यांनी सांगितले.  पक्षाचे प्रदेश प्रमुख असलेल्या नेते आजपर्यंत कधी निवडून आलेले नाहीत, पण, तेही माझ्या विरोधात बोलतात, असा आरोप रेजिनाल्ड यांनी केला.

संबंधित बातम्या