गोवा सोडून मी गावी नाही जाणार...!

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

विद्युत उपकरणे दुरूस्ती करणाऱ्या बंगालच्या रजनीचे मत

संजय घुग्रेटकर
खांडोळा

गोव्यात आम्ही सुरक्षित आहोत. येथे सर्व सुविधा मिळतात. दोन महिने दररोज काम केले तरीसुद्धा संपणार नाही, इतके काम आहे. अनेकांचे पंखे, इस्त्री, मिक्‍सर, विद्युत शेगड्या दुरुस्ती करायच्या आहेत. येथे कामही आहे, त्याचे मोलही चांगले मिळते. तेव्हा आम्ही गावाला का जायचे? ‘मै गाव नही जाऊंगा!’ असे मत माशेल येथे विद्युत उपकरणे दुरूस्त करणारा रजनी मंडळ यांनी व्यक्त केले.
येथील ‘रजनी’ या विद्युत उपकरणे दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या रजनी मंडल पश्चिम बंगालचा असून सोबत उत्तरप्रदेश, बंगालचा एक कारागीर असून त्याच्याकडे करण्यासारखे कामही खूपच आहे. त्यामुळे ते सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत कष्टाने अनेक उपकरणे दुरुस्ती करतात. प्रत्येक उपकरणावर फोन नंबर लिहून ठेवतात. दुरुस्ती झाले की फोन करतात, ग्राहक ठरलेल्या वेळेत येऊन उपकरण घेऊन जातात. दुरुस्ती झाल्यानंतर निश्चित केलेली रक्कम दिली जाते. कोठेही वाद- चर्चा नाहीच. खांडोळा महाविद्यालय रस्त्याजवळ हे दुरुस्तीचे दुकान असल्यामुळे या पंचक्रोशीतील लोकांना आपली यंत्रे दुरुस्तीसाठी चांगली सोय झाली आहे.
टाळेबंदीबद्दल रजनी म्हणाला, दोन महिने दुरुस्तीचे काम बंद होते. पण गेल्या पंधरा दिवसापासून भरपूर काम करायला मिळत आहे. टाळेबंदीतसुद्धा काहीही अडचण झाली नाही. सर्व व्यवहार सुरळीत होते. सर्व नियम पाळून आम्हांला जीवनावश्यक साहित्य मिळाले. काही अडचण झाली नाही. त्यामुळे आमचे कारागीर व परिवारही सुरक्षित आहे. अशी चांगली परिस्थिती असताना गोवा सोडून पश्चिम बंगाल जाणे योग्य वाटत नाही. शिवाय तेथे जाऊन रोजगार शोधावा लागले. रोजगार नसेल तर काहीही करता येत नाही. पैसे कोणीही देत नाही. बेकार बसून अडचणी येतात, त्यापेक्षा येथे रोजगारही आहे आणि जीवनही सुरक्षित आहे. तेव्हा घाईगडबडीत उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्यांनी गोव्यातच थांबायला हवे. इतर राज्यापेक्षा गोवा सुरक्षित आहे. त्यामुळे तेथे जाऊन क्वारंटाईन होण्यापेक्षा येथेच राहायला हवे, असेही रजनी याने आपले मत व्यक्त केले.

प्रामाणिकपणा हवा
रजनी मंडल म्हणाले, गोव्यात गेली सहा वर्षे विद्युत उपकरणे दुरुस्तीचा व्यवसाय करतो. या व्यवसायात खूप पैसे मिळत नसले तरीसुद्धा नियमित काम मिळते. प्रामाणिकपणे काम केले. दुरुस्तीसाठी योग्य पैसे घेतले आणि व्यवस्थित दुरुस्ती करून दिली, तर ग्राहकच आम्हांला अधिक पैसे देतात. त्यामुळे गेल्या सहा वर्षात अनेक ओळखी वाढल्या असून चांगला धंदा होत आहे.

संबंधित बातम्या