‘आयसीएआर’च्या सहकार्याने बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराचा मार्ग; ‘आमचे शेतकार’चा उपक्रम

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

गोव्यात सध्या बेरोजगाराची संख्या वाढत चालली असून अशा स्थितीत कृषी क्षेत्र रोजगार निर्मितीसाठी शेवटचा पर्याय बनलेला आहे.

सासष्टी: बेरोजगार तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी ‘आमचे शेतकार’ हा गट विविध उपक्रम राबवित असून या गटाद्वारे पाळीव प्राण्यांचा वनस्पतीजन्य खुराक मानला जाणारा अझोला आणि सुपर फूड मानल्या जाणाऱ्या अळंबी लागवडीसाठी तरुणांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून गोव्यात परतलेल्या गोमंतकीय तरुणांना या उपक्रमामुळे स्वयंरोजगाराचा मार्ग खुला झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेचसे व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत. कोरोना स्थितीमुळे परदेशात काम करणारे गोमंतकीय मायदेशी परतले आहे. गोव्यात सध्या बेरोजगाराची संख्या वाढत चालली असून अशा स्थितीत कृषी क्षेत्र रोजगार निर्मितीसाठी शेवटचा पर्याय बनलेला आहे.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन गोव्याला सेंद्रीय राज्य बनविण्याच्या तसेच, गोव्यातील बेरोजगार तरुणांना कृषी क्षेत्राच्या माध्यमाने व्यवसाय प्राप्त करून देण्याचा उद्देशाने ‘आमचे शेतकार’ हा गट स्थापन केला आहे. गोव्यातील बेरोजगार तरुणांना कृषी क्षेत्रात रोजगार प्राप्त करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या असून परदेशात काम करणारे गोमंतकीय मायदेशी परतलेले आहेत. या बेरोजगार तरुणांसाठी अझोला आणि अळंबी लागवड करण्याचे प्रशिक्षण भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) गोवा विभागाच्या सहकार्याने देण्यात आले असून यात कोरोना स्थितीमुळे मायदेशी परतलेले तरुण तसेच गोव्याच्या विविध भागातील तरुण सहभागी झाले होते, अशी माहिती आमचे शेतकार गटाचे प्रमुख नितेश बोरकर यांनी दिली. 

अळंबी सुपर फूड
सुपर फूड मानल्या जाणाऱ्या अळंबी लागवडीत कमी गुंतवणूक व जास्त नफा मिळू शकतो. अळंबीची हॉटेल ते पंचतारांकित हॉटेलमध्ये मागणी असल्याने गोव्यातील शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. अळंबीचे पीक घेण्यासाठी जागेचीही फारशी अडचण नसून अगदी घरातील छप्पर तसेच बाल्कनीत अळंबीचे पीक घेणे शक्य आहे. अळंबीला बाजारात मोठी मागणी असल्यामुळे तरुणांना ऑईस्टर आणि मिल्की अळंबी लागवड करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून गोव्यातील अनेक तरुणांना मोठ्या स्तरावर अळंबी लागवड करण्यास सुरवात केली आहे, असे बोरकर यांनी सांगितले.

अझोला दर्जेदार पशुखाद्य
पशुखाद्याचा खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतीजन्य खुराक म्हणून अझोला उपयुक्त असून दूध उत्पादन वाढीसाठी अझोलाचा वापर करणे फायद्याचे आहे. अझोला ही पाण्यात मुक्तपणे वाढणारी जलवनस्पती असून अझोलामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात. गाय, शेळ्या यांना अझोलाचा खुराक दिल्यास त्यांची वाढ चांगली होते कोंबड्यांना योग्य मात्रेत दिल्यास उत्पादनात वाढ होते. गोमंतकीय शेतकऱ्याकडे सर्व काही उपलब्ध असले पाहिजे यासाठी अझोला लागवड करण्यासाठी भर देण्यात आलेला आहे, असे बोरकर यांनी सांगितले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या