डिचोलीत विद्यार्थ्याने साकारली गणरायाची मूर्ती

तुकाराम सावंत
सोमवार, 27 जुलै 2020

माती कला परंपरेशी संबंध नाही, की या कलेचा कोणताही वारसा नाही, अन्‌ त्याने या कलेचे प्रशिक्षणही घेतलेले नाही. तरीसुध्दा केवळ आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने मातीला आकार देत घरीच सुबक अशी गणपतीची मूर्ती साकारलेली आहे. ही किमया केली आहे,

डिचोली

माती कला परंपरेशी संबंध नाही, की या कलेचा कोणताही वारसा नाही, अन्‌ त्याने या कलेचे प्रशिक्षणही घेतलेले नाही. तरीसुध्दा केवळ आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने मातीला आकार देत घरीच सुबक अशी गणपतीची मूर्ती साकारलेली आहे. ही किमया केली आहे, डिचोलीतील देवेंद्र बाळकृष्ण नाईक या तेरा वर्षीय विद्यार्थ्याने. शाळा बंद असल्याने मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून देवेंद्र याने आपल्यातील कलेला बहर देतानाच, कलाकारालाही जिवंत केले आहे. डिचोलीतील श्री शांतादुर्गा विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या देवेंद्र नाईक याला लहानपणा पासूनच चित्रकलेबाबत कुतूहल. टाकाऊ कागद आदी वस्तूंपासून कलाकृती करण्याची त्याला भारी आवड आहे. अधूनमधून तो मातीतही रमत असतो. वडील योग प्रशिक्षक म्हटल्याबरोबर देवेंद्र याचाही योगाशीही संबंध जोडलेला आहे.
यंदा 'कोविड-19' महामारीमुळे शाळा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेतानाच फावल्या वेळेचा सदुपयोग करावा, असा विचार देवेंद्र या विद्यार्थ्याच्या मनात आला. त्यातच पुढील महिन्यात चतुर्थी असल्याने, लागलीच त्याने विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती साकारण्याचा संकल्प केला. त्याने हा संकल्प हाती घेऊन आपल्या कल्पनेतून मातीला आकार देत गणरायाची सुबक मूर्ती साकारली. बोर्डे येथील चित्रकार रवींद्र हरमलकर आणि मये येथील अमर शेट यांच्याकडून त्याला केवळ चिकन मातीच नव्हे तर मूर्ती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. मूर्तीला आकार देण्यासाठी लागणारी लाकडी हत्यारे देवेंद्र यांनी स्वतच बनवली आहेत.. आत्मविश्वास आणि आवड असल्यास कोणतीही अशक्‍यप्राय गोष्ट शक्‍य करता येते. त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भविष्यात देवेंद्र नाईक याने ही कला जिवंत ठेवली, तर आजच्या युवा पिढीसाठी ती नक्‍कीच आदर्शव्रत बाब ठरणार आहे. मूर्ती करण्यासाठी आपल्याला आईवडिलांसह आजोबा आदी घरातील मंडळीकडून कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. उलट प्रोत्साहन मिळाले. असे देवेंद्र नाईक यांनी सांगितले. आपण साकारलेली गणपतीची मूर्ती पाहून अनेकजण आपले कौतुक करतात. ही आपल्यासाठी प्रेरणा देणारी बाब असल्याचे देवेंद्र याने प्रफुल्लित चेहऱ्याने आणि अभिमानाने सांगितले. आता आपण या मूर्तीला रंग देणार आहे. असेही देवेंद्र यांनी सांगितले.

अभिमानाची बाब!
देवेंद्रचे वडील बाळकृष्ण नाईक म्हणाले, ती कलेचा वारसा नसतानाही प्रबळ इच्छेच्या बळावर देवेंद्र याने गणपतीची मूर्ती साकारलेली आहे. फावल्या वेळेचा त्याने उपयोग करून त्याने आपल्यातील कलाकाराला न्याय मिळवून दिला आहे. त्याच्या या कलेबद्दल आपल्याला अभिमान वाटत आहे. देवेंद्र याला फाईन आर्टची आवड आहे.

संपादन ः संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या