मूर्तीकारांची चिकण मातीसाठी लगबग...!

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

डिचोलीतील बोर्डेसह काही नेमक्‍याच ठराविक भागात गणपतीच्या मूर्ती घडविण्यासाठी लागणारी चिकण माती मिळत असते. तरीदेखील पेडणे तालुक्‍यातील वारखंड गावातील 'वेळू' या शेतजमिनीत मिळणारी चिकण माती उत्कृष्ट आणि मूर्ती घडवण्यासाठी उत्तम असल्याने, तेथील मातीला बहूतेक भागातील मूर्तींकार अधिक पसंती देतात.

'डिचोली

गणेश चतुर्थीला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असला, तरी डिचोलीतील मूर्तींकार आता गणपती मूर्ती बनविण्याच्या पूर्वतयारीला लागले आहेत. एकाबाजूने 'कोविड-१९' महामारीचे संकट असले, तरी दुसऱ्याबाजूने पावसाळ्याची चाहूल लागल्याने सध्या डिचोलीतील गणेश मूर्तीकारांची चिकण माती आणण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. बहूतेक मूर्तींकारांनी चिकण माती उपलब्धही केली आहे. डिचोलीतील बोर्डेसह काही ठराविक भागात चिकण माती मिळत असली, तरी डिचोलीतील बहूतेक मूर्तींकार पेडणे तालुक्‍यातील वारखंड गावातील मातीला अधिक पसंती देतात. यंदा मात्र वारखंड गावातून चिकण माती मिळणे बरेच अवघड झाले आहे. त्यामूळे डिचोलीतील मूर्तीकारांनी स्थानिक बोर्डे येथील चिकण मातीचा पर्याय निवडला असून, मूर्तीकारांनी बोर्डेतील माती उपलब्धही केली आहे. पावसात चिकण माती काढणे अशक्‍य होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यापुर्वीच म्हणजे साधारण मे महिन्यात चिकण माती आणण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरु असते. यंदाही बहूतेक मूर्तींकारांनी चिकण माती आणली असून, ती आपापल्या चित्रशाळांजवळ साठवून ठेवल्याचे आढळून येत आहे. डिचोली तालुक्‍यात जवळपास ११५  गणपतीच्या चित्रशाळा असल्याची माहिती मिळाली आहे. मये गावातच ४० हून अधिक चित्रशाळा आहेत. डिचोलीसह मयेतील चित्रशाळांमधील गणपतीच्या मूर्तींना तालुक्‍याबाहेरील विविध भागातूनही मागणी असते.  
'वारखंड' ची माती अवघड ! 
डिचोलीतील बोर्डेसह काही नेमक्‍याच ठराविक भागात गणपतीच्या मूर्ती घडविण्यासाठी लागणारी चिकण माती मिळत असते. तरीदेखील पेडणे तालुक्‍यातील वारखंड गावातील 'वेळू' या शेतजमिनीत मिळणारी चिकण माती उत्कृष्ट आणि मूर्ती घडवण्यासाठी उत्तम असल्याने, तेथील मातीला बहूतेक भागातील मूर्तींकार अधिक पसंती देतात. डिचोलीसह मये आदी भागातील बहूतेक मूर्तीकारांचाही वारखंड येथील चिकण माती आणण्याकडे कल असतो. यंदा मात्र,वारखंडमधील माती मिळवणे कटकटीचे बनले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माती काढून देण्याची व्यवस्था यंदा देवस्थान समितीने केली नसल्याने, मूर्तीकारांना पैसे मोजून स्वत: माती काढावी लागत आहे. त्यामुळे मातीसाठी मूर्तींकारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. डिचोलीसह मयेतील अधिकाधिक मूर्तींकारांनी यंदा बोर्डे येथील शेतीतील मातीचा पर्याय निवडला आहे. डिचोलीसह मयेतील मूर्तीकारांनी बोर्डे येथील शेतातील चिकण माती उपलब्धही केली आहे.  

वारखंड येथील चिकण माती अधिक चांगली आहे. वारखंड येथील मातीचे दर आणि वारखंडहून प्रति ट्रक डिचोलीपर्यंत माती आणण्यासाठी लागणारा भाडे खर्च आणि माती व्यवस्थित साठवून ठेवीपर्यंत मागील वर्षी साधारण २० हजार रुपये खर्च आला होता. यंदा 'वारखंड' मधील माती मिळणे दुरापास्त झाल्याने स्थानिक बोर्डेतील मातीचा पर्याय निवडावा लागला आहे. माती आणून ती साठवून ठेवीपर्यंत प्रति ट्रक आठ हजार रुपयांच्या आत खर्च येत आहे. 
-विलास कुंकळ्येकर, मूर्तीकार, डिचोली. 

 

 

संबंधित बातम्या