'आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर लवू मामलेदार न्यायालयात दाद का मागत नाहीत?'

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

मगोचे माजी सरचिटणीस लवू मामलेदार यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत असेल, तर ते न्यायालयात दाद का मागत नाहीत, अशी विचारणा मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.

पणजी- मगोचे माजी सरचिटणीस लवू मामलेदार यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत असेल, तर ते न्यायालयात दाद का मागत नाहीत, अशी विचारणा मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.

ते म्हणाले, मामलेदार यांच्यावर पक्षाने कारवाई केल्यानंतर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. फेब्रुवारीत त्यांनी त्याविषयी आयोगाला कळवले होते. आयोगाने त्यांना पक्षाकडेच दाद मागण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी काही केले नाही. परत आयोगाकडे जाऊन त्यांनी काय मिळवले हे लवकरच समजेल, पण त्यातून काही निष्‍पन्न होणार नाही. कारण आयोगाच्या आदेशानुसार पक्षाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

ते म्हणाले, मगोला बदनाम करण्यासाठी काही हालचाली सुरू आहेत. दिल्लीत गेल्यावर आपले मगो पक्षाचे सरचिटणीसपद अबाधित आहे असे भासवण्याचा मामलेदार यांचा प्रयत्न याच गटात येणारा आहे. त्यातून केवळ मतदार आणि जनतेची दिशाभूल होते. काहींना तसेच झालेले हवे आहे. तथ्य नसलेली माहिती पुरवून ते दोन दिवस सुख उपभोगतील, पण कधीतरी सत्य समोर येणारच आहे. कोणत्याही पक्षाची घटना ही सर्वोच्च असते. पक्षाचा कारभार त्यानुसार चालत असतो. कोणतीही कारवाईही त्याच चौकटीत असते. त्यामुळे घटनेचे पालन केले नाही, तर न्यायालयात दाद मागता येते, गेल्या दोन वर्षात मामलेदार यांनी तसे का केले नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.

विधानसभा पोटनिवडणुकीवेळी मामलेदार यांनी अनेक आरोप केले होते. त्याचे पुढे काय झाले त्यांनाच माहीत. त्याशिवाय शिरोडा पोटनिवडणुकीत  पक्षाचा अध्यक्ष लढत असताना ते विरोधी पक्षाच्या मंचावर गेले होते. त्यावेळी अर्थात ते पदावर नव्हते. त्यामुळे त्यांनीच आपल्या कृतीतून आपण पक्षाच्या पदावर आता नाही हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता मला सरचिटणीस समजा या त्यांच्या टाहोला तसा अर्थ नाही. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन केवळ चर्चा करून पक्षाचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय होणार असे म्हणणे कोणालाही पटणारे नाही हेही त्यांनी समजून घ्यावे, असा टोला ढवळीकर यांनी लगावला.

संबंधित बातम्या