"गोमंतकीयांनी काळजी घ्यावी" मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन...

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

राज्यात हिवाळ्यात शीतलहरीवेळी डिसेंबर - जानेवारीत कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. या काळात गोमंतकीयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे केले.

पणजी: राज्यात हिवाळ्यात शीतलहरीवेळी डिसेंबर - जानेवारीत कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. या काळात गोमंतकीयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे केले. राज्यात पर्यटक म्हणून येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध घालण्याचा सरकारचा विचार नाही. मात्र, विमान व रेल्वेतून येणाऱ्यांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करणे सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात कोविड व्यवस्थापनाच्या आघाडीवर काम उत्तमरीत्या सुरू आहे. राज्याबाहेरून आलेल्यांनी मास्क वापरणे, शारिरीक अंतर पाळणे आणि स्वच्छता राखणे महत्त्‍वाचे आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करत आहे. त्यामुळे पर्यटकांवर बंदी घालण्याची गरज नाही. प्रत्येकाने जबाबदारीने वागल्यास कोविडचा प्रसार राज्यात होणार नाही. आम्हीच जर सार्वजनिक ठिकाणी शारिरीक अंतर पाळले नाही, तर कोविडचा प्रसार होणार आणि त्याचे खापर राज्याबाहेरून आलेल्यांवर फोडणार, असे होणार नाही. सरकार याबाबतीत गंभीर आहे म्हणून मास्क न वापरणाऱ्यांना दोनशे रुपये दंडाची तरतूद केली आहे.

प्रत्‍येकाने दक्ष राहावे
हिवाळ्यात कोविडचा प्रसार वाढू शकतो, असा इशारा जगभरातील तज्ज्ञ देऊ लागले आहेत. देशात कडक हिवाळा असलेल्या ठिकाणांत गोव्याचा समावेश होत नसला, तरी डिसेंबर ते जानेवारीत शीतलहर राज्यात असते. थंडी पडते. याकाळात कोविड प्रसार होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. राज्याबाहेरून येणाऱ्यांना कोविड लागण नसल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा निर्णय काही राज्य सरकारांनी घेतला आहे. तो त्यांचा निर्णय आहे. राज्यात तसे काही आताच करावे, असे वाटत नाही. सद्य परिस्थितीवर सरकारची नजर आहे. 

पंतप्रधानांकडून आभासी संवाद
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड व्यवस्थापनाविषयी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी आज आभासी पद्धतीने संवाद साधला. त्या संवादावेळी त्यांनी कोविडविरोधी लस येईपर्यंत जनतेने सर्व काळजी घ्यावी, यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्नशील राहावे असे नमूद केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 आणखी वाचा :

संबंधित बातम्या