हिम्मत असेल तर बैठक घेऊन दाखवावी

Premanand Naik
रविवार, 9 ऑगस्ट 2020

हिम्मत असेल, तर मेळावली देवस्थान परिसरात बैठक घेऊन दाखवावी असे प्रतिउत्तर आज मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव समितीच्या बैठकीत गुळेली आयआयटी बचाव समितीला केले आहे. गुळेली पंचायत क्षेत्रात प्रकल्प, मग गुळेली पंचायत क्षेत्राबाहेर पत्रकार परिषदा कशाला घेता, असा सवालही मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव समितीचे शंकर देवळी, वसंत मेळेकर उपस्थित होते.

गुळेली
शशिकांत सावर्डेकर पुढे म्हणाले, की तुमचे पूर्वज या ठिकाणी जन्मले, तुम्ही या भूमीत जन्माला आला आणि त्याच भूमीवर अन्याय करतात. आयआयटीसंदर्भात काय चांगले आहे ते आम्हाला पटवून द्या. आयआयटी बचाव समितीच्या आरती घोलकर यांना आपण सांगू इच्छितो की हा प्रकल्प जर एवढा चांगला आहे, तर त्यांनी तो आपल्या खोतोडा पंचायत क्षेत्रांमध्ये न्यावा आम्हाला हा प्रकल्प नको आहे. आमचा या प्रकल्पाला कायम विरोधच असेल.
मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव समितीचे शंकर देवळी म्हणाले, की आयआयटी बचाव समिती ही का स्थापन करावी लागली याचे उत्तर समितीने द्यावे. या गुळेली आयआयटी बचाव समितीचे अध्यक्ष श्याम सांगोडकर यांनी हा निर्णय आपल्याच मुरमुणे गावातील लोकांचा विचार ऐकून घेतला आहे का? बचाव समिती म्हणते की सत्तरीतील लोकांच्या सह्या घेणार आहे. श्याम सांगोडकर यांनी आपल्या गावातील म्हणजे मुरमुणे गावातील सह्या आधी घेऊन दाखवाव्यात. मुरमणेतील लोकांच्या जमिनी या प्रकल्पासाठी जास्त जात आहेत याचा विचार कधी त्यांनी केलेला आहे का?
श्याम सांगोडकर यांनी वन खात्याची जमीन कोणत्या प्रकारे मिळवली ते सर्व ज्ञात आहे. आम्ही आमचे पूर्वज पोर्तुगीज काळापासून या जमिनी कसत आहोत, वसवत आहोत आणि तुम्ही म्हणताय की या सरकारी जमिनी आहे. आता इथे सरकार कुठून आल? आमच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही तुम्हाला जाहीर निमंत्रण देतो, त्यावेळी चर्चा करू आणि काय वाईट, काय चांगले याच्यावर त्यावेळी बोलू. तुम्हाला हिम्मत असेल तर बैठक बोलवाच. आमचा या आयटी प्रकल्पाला विरोध आहे आणि तो राहणारच. आम्ही यासाठी आमचा लढा चालू ठेवणार आहोत, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या