गुळेलीत दोन वर्षात आयआयटी संकूल

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

कोविड १९ महामारीविरोधात राज्य झुंजत असतानाच राज्य सरकारने हा मोठा निर्णय अमलात आणला असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

पणजी

गुळेली सत्तरी येथे येत्या दोन वर्षात आयआयटीचे संकुल उभे राहणार आहे. आज त्यासाठी राज्य सरकारने १० लाख चौरस मीटरचा भूखंड आयआयटीकडे हस्तांतरीत केला. कोविड १९ महामारीविरोधात राज्य झुंजत असतानाच राज्य सरकारने हा मोठा निर्णय अमलात आणला असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परीमल राय, शिक्षण सचिव नीला मोहनन, तंत्रशिक्षण संचालक विवेक कामत, आयआयटीचे संचालक बी. के. मिश्रा यांच्या उपस्थितीत हा भूखंड हस्तांतर करण्याची प्रक्रीया करण्यात आली. देशाबाहेर अडकलेल्या भारतीयांना आणण्याची सुरवात केंद्र सरकारने केली आहे. यात गोमंतकीयांचा समावेश आहे. पहिल्या सात दिवसात गोव्यासाठी थेट विमानसेवा नसली तरी शेजारील राज्यात येणाऱ्या विमानांतून गोमंतकीय येऊ शकतील. तेथून रस्ता मार्गे ते गोव्यात येतील. येथे त्यांची आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था केली आहे. विविध देशात असलेल्या ३ हजार १०० जणांनी सरकारकडे यासाठी नोंदणी केली आहे. त्यांना त्या देशातील भारतीय वकीलातींच्या संपर्कात रहा असा सल्ला देण्यात आला आहे. गोमंतकीयांची यादी विदेश व्यवहार मंत्रालयाला संपर्काचे क्रमांक, ईमेलसह देण्यात आली आहे.
विविध राज्यांत सुमारे साडेचार हजार गोमंतकीय अडकून आहेत. त्यांनी राज्य सरकारकडे संपर्क साधला आहे. त्यांना तूर्त आपणच येण्याची व्यवस्था करावी लागत आहे. काही राज्यांत येथे अडकून असलेले त्या राज्यातील लोक कदंब बस भाड्याने घेऊन जात आहेत. त्या कदंब बसमधून ते अडकलेले गोमंतकीय परतू शकतात. कदंब बस कोणत्या मार्गावर जात आहेत याची माहिती त्यांना वेळोवेळी दिली जात आहे. गोवा सध्या हरीत विभागात असून तो तसाच राहण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. गोव्याबाहेरून आलेल्यांनी १४ दिवस घरातच अलगीकरणात राहणे आवश्यक आहे. तसा हातावर शिक्का असलेली व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास सरकारला त्याची माहिती देणे आवश्यक आहे.
परप्रांतीयांना हाकलण्याची भाषा काहीजण वापरत होते. आता परप्रांतीय जात आहेत तर मग राज्यावर संकट आल्याचा बाऊ का केला जावा अशी विचारणा एका प्रश्नावर करून ते म्‍हणाले, दोन दिवसात रेल्वे वाहतुकीबाबत निर्णय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने त्याबाबत काही कळवलेले नाही. आंग्रीया आणि कर्णिका या जहाजांवरील खलाशांना गोव्यात आणण्याचा निर्णय त्या जहाजाच्या मालकांनी घेतला पाहिजे. त्या कंपन्या निर्णय घेत नसल्याने गोमंतकीय खलाशी आरोग्य चाचणीनंतरही मुंबई बंदरात राहिल्या आहेत. सध्या राज्यातून इतर राज्यात जाणाऱ्यांची कोणताही आरोग्य तपासणी केली जात नाही असेही त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

 

संबंधित बातम्या