आयआयटी प्रकल्प मेळावलीऐवजी बार्देशमध्येच हवा

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

अलीकडच्या काळात गोव्यात आयआयटीच्या संदर्भात राज्यभर विविध मत-मतांतरे व्यक्त होत असल्याच्या तसेच सत्तरी तालुक्यात मेळावली येथे त्यास विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर असा प्रकल्प आता बार्देश तालुक्यातच उभारण्याचा सरकारने विचार करावा, अशा प्रतिक्रिया म्हापसा येथील काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

म्हापसा: अलीकडच्या काळात गोव्यात आयआयटीच्या संदर्भात राज्यभर विविध मत-मतांतरे व्यक्त होत असल्याच्या तसेच सत्तरी तालुक्यात मेळावली येथे त्यास विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर असा प्रकल्प आता बार्देश तालुक्यातच उभारण्याचा सरकारने विचार करावा, अशा प्रतिक्रिया म्हापसा येथील काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

म्हापसा शहर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ‘स्वराज्य गोमंतक’चे अध्यक्ष प्रशांत वाळके, शिक्षण-कला क्षेत्रातील अभिरुचिसंपन्न व्यक्तिमत्त्व डॉ. अरुण भोबे, राष्ट्रवादीचे संजय बर्डे व ॲड. गौतम पेडणेकर, भाजपाचे मनोज सावंत, सुरेंद्र शेट्ये, सामाजिक कार्यकर्ता सदानंद नार्वेकर, जीवन मिशाळ, अशा काही व्यक्तींनी या मागणीचा प्रखरतेने पुरस्कार केला आहे. या संदर्भात ते म्हणाले, की म्हापसा शहर हे उत्तर गोव्याच्या आर्थिक विकासाचे महाद्वार मानले जाते. परंतु, म्हापसा शहरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने, बार्देश तालुक्यात थिवी अथवा आसगावसारख्या पठारांचा त्या दृष्टीने विचार करता येईल. 

ॲड. गौतम पेडणेकर यांनी सांगितले, भारतातील नामवंत कंपन्या दरवर्षी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये येऊन स्वत:च्या कंपनीत अशा विद्यार्थ्यांची भरती करून घेण्याच्या प्रयत्नात असतात. सर्वसाधारणपणे कॉलेजची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वीतच अशा विद्यार्थ्यांची कंपन्यांकडून निवड झालेली असते. दर्जेदार शिक्षणाबाबत तेवढी विश्वासार्हता ‘आयआयटी’ शैक्षणिक संस्थांनी प्राप्त केलेली आहे. नोकऱ्यांच्या व्यतिरिक्त आयआयटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधनकार्यही केले जाते व त्याचा लाभ उद्योग तथा व्यापारी जगताला तसेच व्यापक स्तरावर एकंदर समाजासाठीही होत असतो. आयआयटी सांगे-सत्तरीत नको तर बार्देशात आणावी. प्रसंगी आंदोलन अथवा लढा देऊनही आपल्या म्हापशाचे नाव खरगपूर, रूरकी, कानपूर, पवईसारखे जगाच्या नकाशावर आणता येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कार्यकर्ता सुरेंद्र ऊर्फ यशवंत शेट्ये यांनी व्यक्त केली. 
 

म्हापसा शहर व बार्देश तालुका एके काळी उत्तर गोव्याचा मुकूटमणी होता. कारण वि…
"म्हापशात आयआयटीसारखा प्रकल्प साकार झाल्यास म्हापसा परिसराला तसेच बार्देश तालुक्यालाही, आर्थिकदृष्ट्या गतवैभव प्राप्त होऊन या तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला उत्थान प्राप्त होईल; तसेच, अशा प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या विपुल संधीही प्राप्त होतील. व्यापार-उदिमालाही तेजगतीने चालना मिळेल. म्हापशात तसेच बार्देश तालुक्यात कित्येक ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून अशा स्वरूपाचे प्रतिष्ठाप्राप्त प्रकल्प या भागात आणण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे."
- प्रशांत वाळके, (अध्यक्ष - स्वराज्य गोमंतक, म्हापसा)

"एकेकाळी केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेला गोवा ड्रग्ज, वेश्याव्यवसाय आणि कॅसिनोसारख्या गोष्टींमुळे बदनामीच्या विळख्यात सापडला आहे. आयआयटीसारखे प्रतिष्ठा वाढवणारे प्रकल्प गोव्याची मलीन होत चाललेली प्रतिमा बदलण्यास उपयुक्त ठरतील. पण जर असे प्रकल्प नैसर्गिक संपत्तीची हानी करून उभारल्यास निसर्गरम्य गोव्याच्या अस्तित्वालाच आव्हान दिल्यासारखे होईल. मेळावलीचे नैसर्गिक सौंदर्य आणि उत्पन्न अबाधित ठेवून अन्यत्र कुठल्याही पडीक जमिनीवर तो प्रकल्प उभा होऊ शकतो आणि झालाच पाहिजे."
- जितेश कामत, (शिवसेना गोवा राज्यप्रमुख)

संबंधित बातम्या