डिचोलीत नवीन पुलावरून नियमबाह्य वाहतूक

Dainik gomantak
गुरुवार, 21 मे 2020

नवीन पुलावरून ‘प्रवेश बंदी’च्या दिशेने अधूनमधून विशेष करून रात्रीच्यावेळी वाहतूक करण्याचे प्रकार अद्याप तरी नियंत्रणात आलेले नाही. ‘सेतू संगम’च्या प्रवेशव्दारासमोर वाहतूक बेट उभारण्याचा प्रस्तावही वर्षापूर्वी विचारात आला होता. मात्र, या प्रस्तावाची कार्यवाही झाली नसल्याचे समजते.

डिचोली, 

डिचोलीतील नवीन पुलावरुरून ‘प्रवेश बंदी’च्या दिशेने वाहतूक करण्याच्या प्रकारावर अद्याप पूर्णपणे नियंत्रण आले नसून अधूनमधून नियमबाह्य वाहतूक सुरूच असल्याचे समजते. काल (बुधवारी) रात्री ‘प्रवेश बंदी’च्या दिशेने पुलावरून वाहतूक करणारा राज्याबाहेरील एक अवजड ट्रक काही स्थानिक युवकांनी अडवून माघारी पाठवला.
डिचोली नदीवरील जुन्या पुलाला समांतर नवीन पूल बांधल्यापासून दोन्ही पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. साखळीहून डिचोलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलावरून तर डिचोलीहून साखळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पुलावरून वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र, सुरवातीपासूनच नवीन पुलावरून ‘प्रवेश बंदी’ असलेल्या दिशेने वाहतूक करण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष करून रात्रीच्यावेळी हे प्रकार सर्रासपणे घडतात अशी माहिती मिळाली आहे. ‘नो एन्ट्री’च्या दिशेने अचानक एखादे वाहन नवीन पुलावर येताच बऱ्याचदा समोरून येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडत असतो. काहीवेळा वाहतूक कोंडीबरोबरच लहान-सहान अपघातही घडत असतात. साखळीवरून येताना दोन्ही पुलांच्या मधोमध ‘सेतू संगम’ प्रकल्पाच्या प्रवेशव्दारासमोर दिशादर्शक फलक लावण्यात आलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बऱ्याचदा राज्याबाहेरून येणारी वाहने जुन्या पुलावरून वाहतूक करण्याचे सोडून सरळ नवीन पुलावर घुसतात. या नियमबाह्य वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी वर्षापूर्वी त्याठिकाणी महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आला आहे. 

 

संबंधित बातम्या