मालिम-बेती जेटी येथे बेकायदा मासे विक्री

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

मालिम - बेती मच्छिमारी जेटी येथील परिसरात रस्त्याच्या बाजूने पहाटेच्या सुमारास करण्यात येणाऱ्या बेकायदा मासे विक्रीवरून आज तेथील मच्छिमारी ट्रॉलर्सधारक आक्रमक झाले. या मासे विक्रेत्यांना कायमचे तेथून हटविण्याची मागणी केली. या ठिकाणी तपासणीस आलेल्या पेन्ह - द - फ्रान्स पंचायतीच्या सरपंचांनी या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

पणजी : मालिम - बेती मच्छिमारी जेटी येथील परिसरात रस्त्याच्या बाजूने पहाटेच्या सुमारास करण्यात येणाऱ्या बेकायदा मासे विक्रीवरून आज तेथील मच्छिमारी ट्रॉलर्सधारक आक्रमक झाले. या मासे विक्रेत्यांना कायमचे तेथून हटविण्याची मागणी केली. या ठिकाणी तपासणीस आलेल्या पेन्ह - द - फ्रान्स पंचायतीच्या सरपंचांनी या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

मालिम - बेती मच्छिमारी जेटीच्या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून पणजीबाहेरून मासळी घेऊन वाहने येतात. ही मासळी तेथील मासे विक्रेते विकत घेऊन तेथेच विक्री करतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे मासे विक्रीसाठी बांधकामे उभारली आहेत. त्या ठिकाणी असलेल्या वीज खात्याच्या ट्रान्स्फॉर्मरच्या ठिकाणीही ही मासे विक्री केली जात आहे. पणजी बाहेरून येणारी मासळी स्वस्त विकली जात असल्याने या जेटीवरील ट्रॉलर्सधारकांकडून कोणी मासळीच घेत नाहीत.

यासंदर्भातची माहिती पंचायतीला देण्यात आल्यावर तेथील काही बेकायदा बांधकामे हटविण्यात आली होती मात्र पुन्हा तेथे ही बेकायदा विक्री सुरू झाल्याने ट्रॉलर्सधारकांनी तपासणीसाठी आलेल्या पंचायत मंडळाला फैलावर घेतले. त्याला उत्तर देताना सरपंचांनी सांगितले की या मासे विक्रेत्यांना हटविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र आज तपासणीवेळी हे विक्रेतेच उपस्थित नसल्याने ही बेकायदा गाळे मोडण्यात येतील. त्यासाठी पुन्हा पोलिसांना यासंदर्भात माहिती देऊन रस्त्याच्या बाजूने बसणाऱ्या मासे विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली जाणार आहे. 

पणजीबाहेरून मालीम - बेती येथे मासळी वाहने पहाटेच्या सुमारास येतात. ही मासळी तेथे रस्त्याच्या बाजूला बसून काही विक्रेते ती विकतात व ती घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. बेकायदा मासे विक्रेते येथे बसून मासळी विकत असली तरी पोलिस कोणतीच कारवाई करत नाही. या विक्रेते अनेकजण परप्रांतीय असतात. ही मासळी स्वस्त दराने विकली जात असल्याने जेटीवर आलेल्या ट्रॉलर्समधील मासळीला भाव मिळत नाही व ती खरेदी करण्यास व्यापारी मिळत नाही. या मासळी व्यवसायवरून तेथे अनेकदा बाचाबाची व भांडणे होत असतात. त्यामुळे पंचायतीने या बेकायदा मासे विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून कायमचा तोडगा काढण्याची मागणी संबंधित ट्रॉलर्सधारकांनी केली आहे.

संबंधित बातम्या