गोवा प्रदेश युथ काँग्रेस ने काढला खाण खात्यावर मोर्चा

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

मुरगाव बंदर परिसरात खनिज मालाची बेकायदेशीररित्या लूट केली जात असल्याप्रकरणी गोवा प्रदेश युथ काँग्रेसतर्फे खाण खात्यावर मोर्चा नेण्यात येऊन खाण उपसंचालकांना घेराव घालण्यात आला.

पणजी : मुरगाव बंदर परिसरात खनिज मालाची बेकायदेशीररित्या लूट केली जात असल्याप्रकरणी गोवा प्रदेश युथ काँग्रेसतर्फे खाण खात्यावर मोर्चा नेण्यात येऊन खाण उपसंचालकांना घेराव घालण्यात आला. खाण खात्याची कोणतीही परवानगी नसताना जो बेकायदा खनिज माल जहाजामध्ये भरण्यात आला आहे तो रिक्त करण्यात यावा तसेच या मालाच्या चोरीप्रकरणामध्ये गुंतलेल्यांची चौकशी क्राईम ब्रँच किंवा सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली. 

मुरगाव बंदरातील खनिज मालाच्या हाताळणीच्या ठिकाणी असलेल्या खनिज मालाची माहिती खाण खात्याला न देता बंदरातून तो तेथे उभ्या असलेल्या जहाजामध्ये भरण्यात येत आहे. नियमानुसार या मालाचा ई लिलाव व्हायला हवा मात्र तो केलेला नाही. यापूर्वी तेथून वाहतूक करण्यात आलेल्या खनिज मालाचा ५८ ग्रेड असताना खाण खात्याने उर्वरित खनिज माल सुमारे ५० ग्रेड असल्याचे नमूद केले.
आहे यावरून त्यात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केला. या मालाची तपासणी न करता त्याला ग्रेड कोणत्या आधारावर करण्यात आली असा प्रश्‍न त्यांनी केला. कोडी रिसोर्सीसच्यावतीने एमएन कन्स्ट्रक्शनने मशिनरी आणून हा खनिज माल उचलून तो जहाजामध्ये भरण्यास सुरुवात केली आहे. हे सर्वकाही दोघांच्या संगनमताने तसेच मुरगाव बंदराचे अधिकारीही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. 

खनिज माल बेकायदेशीररित्या धक्क्याच्या ठिकाणी नेऊन तो एमव्ही तुंगा या बार्जमध्ये वजन केल्याशिवाय भरण्यात येत आहे. खनिज मालाची बंदरातील वजन यंत्रे ही खाण खात्याशी जोडलेली आहेत. जर त्याचे वजन झाले तर त्याची नोंद होईल त्यामुळे हा माल वजन न करताच तो बार्जमध्ये भरला जात आहे. तेथील १९६५ मेट्रीक टन खनिज मालाचे वजन न करताच तो ट्रकामधून भरून बार्जमध्ये जमा केला जात आहे. आताच्या घडीस या मालाची किंमत सुमारे ८० लाखाच्या आसपास आहे. खाण खात्याने या बार्जला जहाजात खनिज माल भरण्यास कशी परवानगी दिली याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. बंदरातील परिसरात असलेला खनिज माल कोडी रिसोर्सीस व एमएन कन्स्ट्रक्शनला हा माल उचलण्यास कशी परवानगी दिली? अतिरिक्त असलेल्या मालाची माहिती उघड का करण्यात आली नाही असा प्रश्‍न त्यांनी अधिकाऱ्यांना केला. खाण खात्याच्या कार्यालयात नेलेल्या मोर्च्यामध्ये गोवा प्रदेश युथ काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भरारी यांचा समावेश होता. 

जो बेकायदेशीर खनिज माल एमव्ही तुंगा या जहाजामध्ये बार्जमधून जमा करण्यात आला आहे तो पुन्हा धक्‍क्यावर आणण्यात यावा. एमएन कन्स्ट्रक्शनने बंदराच्या जागेवरील खनिज माल उचलताना तेथील जागेचे केलेले नुकसान व केलेल्या चोरीप्रकरणी त्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा. ५० ग्रेडचा माल उचलण्याची परवानगी असताना ५८ ग्रेड माल उचलण्यात आल्याने त्याची चौकशी केली जावी तसेच कोडी रिसोर्सीसकडून माल ताब्यात घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या