पणजी स्मार्ट सिटीचे वाहन पार्किंगचे दर गोमंतकीयांना परवडतील का?

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

पणजी शहरातील पार्किंग व्यवस्थेला आकार देण्यासाठी इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) या कंपनीने पार्किंग धोरणाचा आराखडा तयार केला आहे

पणजी: पणजी शहरातील पार्किंग व्यवस्थेला आकार देण्यासाठी इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) या कंपनीने पार्किंग धोरणाचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा संकेतस्थळावरही उपलब्ध आहे, परंतु तो अंमलात आणणे खरोखरच आयपीएससीडीएलला शक्य आहे का हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

आयपीएससीडीएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदीप्ता पाल चौधरी यांच्या काळात पार्किंग धोरणाचा आराखडा तयार झाला होता. त्यांची त्या पदावरून हकालपट्टी झाली तरी त्यांनी केलेली कामे पुढे सुरू आहेत. स्मार्ट सिटीसाठी आवश्‍यक असलेल्या वाहन पार्किंगसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. तो सध्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील वाहनांसाठी मासिक शुल्क आकार कसा असू शकतो, हे दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाहनधारकांना ७०, ८० आणि ९० टक्के सवलत देऊन मासिक दर कसे असू शकतील हे स्पष्ट केले आहे. 

शहरात ज्यापद्धतीने कार पार्किंग केले जाते, त्याऐवजी पॅरलल, एका रेषेत डाव्या बाजूला कार पार्किंग असावे, असेही दर्शविण्यात आले आहे. जर अशी पद्धत वापरली तर शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊ शकते, त्यासाठी परदेशातील छायाचित्रे उदाहरणासाठी दर्शविण्यात आली आहेत. आयपीएससीडीएलने मासिक दर ठरविताना स्थानिक आणि कामासाठी येणाऱ्यांकरिता कसे असतील, याचा आराखडा मांडला आहे. दुचाकी, चारचाकी, कमी वजनाचे मालवाहतूक करणारे, मोठे मालवाहतूक ट्रक अशा प्रकारे चार गटात वेगवेगळे पार्किंगचे दर ठरविले आहेत. 

पार्किंगची चार गटात वर्गवारी
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दुचाकीसाठी पहिल्या तासाकरीता आयपीएससीडीएलने ५ रुपये ठरविले असून सध्या पे पार्किंगसाठी नेमलेली कंपनी ४ रुपये घेते. तसेच पार्किंगसाठी वर्गही करण्यात आले आहेत. जनरल झोन (विदाऊट डायनामिक प्राइझिंग), जनरल झोन (विथ डायनामिक प्रायझिंग), कंझर्वेशन झोन (विदाऊट डायनामिक प्रायझिंग), कंझर्वेशन झोन (विथ डायनामिक प्रायझिंग), कमर्शिअल सीबीडी झोन (विदाऊट डायनामिक प्रायझिंग) आणि कमर्शिअल सीबीडी झोन (विथ डायनामिक प्रायझिंग) असे सहा गट करण्यात आले आहेत. त्यात त्या क्षेत्रानुसार वेगवेगळे पार्किंग दर दर्शविण्यात आले आहेत.

आणखी वाचा:

गोव्यातील मुलींच्या लग्नाला, शिक्षणाला आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत हवी असेल तर घ्या या योजनेचा लाभ - 

संबंधित बातम्या