गोव्यात आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस; वेधशाळेचा मच्छीमारांना इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

राज्यात पुढील चार दिवसांत काही भागात ११.५ सेंटिमीटर पाऊस पडण्याची तर २ ते ३ ठिकाणी २०.५ सेंटिमीटर पाऊस पडू शकतो. राज्यात दक्षिण - पश्‍चिम भागातील पाऊस अधिक सक्रिय झाला असून काही ठिकाणी कमी ते मध्यम प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्‍याची शक्यता आहे. 

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले. पश्‍चिम बंगालच्या पूर्व मध्यकडील उपसागरात वादळी पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम गोव्यात दिसून येणार आहे. त्यामुळे येत्या पुढील चार दिवसांत (१९ ते २२ सप्टेंबर) राज्यात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यात पुढील चार दिवसांत काही भागात ११.५ सेंटिमीटर पाऊस पडण्याची तर २ ते ३ ठिकाणी २०.५ सेंटिमीटर पाऊस पडू शकतो. राज्यात दक्षिण - पश्‍चिम भागातील पाऊस अधिक सक्रिय झाला असून काही ठिकाणी कमी ते मध्यम प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्‍याची शक्यता आहे. 

पणजी व काणकोण येथे गेल्या चोवीस तासांत प्रत्येकी ८ सेटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त मुरगाव ६ सेंटिमीटर, वाळवई ४, पेडणे व दाबोळी प्रत्येकी ३, मडगाव व केपे प्रत्येकी २, तर साखळी, सांगे व जुने गोवे येथे प्रत्येकी एक सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १९ ते २२ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राज्यात असेल, मात्र २३ सप्टेंबर नंतर हा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 

समुद्र खवळलेला असल्याने गोवा किनारपट्टी भागात ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना किनारपट्टीपासून ७५ किलोमीटरबाहेर न जाण्याचा इशारा वेधशाळने दिला आहे.

लोकांची तारांबळ
आज दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता व सतत पडणाऱ्या या पावसामुळे लोकांचे बरेच हाल झाले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत होती. पणजी शहरातील काही भागात रस्त्याच्या बाजूने असलेली पाणी वाहून जाण्यासाठी असलेली गटारे तुंबली होती. कांपाल येथील परेड मैदानासमोरील रस्त्यावरील सखल भागात तसेच मिरामार येथील सर्कलच्या ठिकाणी पाणी साचले होते. पणजी कदंब बसस्थानक येथील आजुबाजूचा रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने त्यात पाणी साचून राहिले होते.

रात्रीपासून पाऊसाने जोर धरला होता आज सकाळपर्यंत कायम होता. दुपारनंतर हा जोर काही प्रमाणात ओसरला. राज्यात दिवसभर पावसाचा जोर कायम असला तरी झाडे पडण्याची तसेच फांद्या मोडून पडण्याचे प्रकार तसे घडले नाहीत मात्र सांपेर - जुने गोवे येथील इव्हेंट कंपनीच्या शेडला आग लागली. या शेडमध्ये डेकोरेटर्सचे सामान होते ते खाक झाले. आगीत सामानाचे किती नुकसान झाले याची तपशिलवार माहिती देण्यात आली नाही असे जुने गोवे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या