पर्यटन, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन हवे, रस्त्यांची त्वरित दुरुस्ती हवी

वार्ताहर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

तिसवाडी तालुका संपूर्ण गोमंतकात सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कारणांसाठी प्रसिद्ध असला तरी विकासकामांच्या दृष्टीने खूपच मागे आहे. या तालुक्याचा हवा तसा विकास झाला नाही

गोवा वेल्हा: तिसवाडी तालुका संपूर्ण गोमंतकात सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कारणांसाठी प्रसिद्ध असला तरी विकासकामांच्या दृष्टीने खूपच मागे आहे. या तालुक्याचा हवा तसा विकास झाला नाही. लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष मेहनत घेतली नसल्याचे चित्र येथील एकंदरीत परिस्थिती पाहिल्यावर स्पष्ट होते. या भागात लोकांना अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. राज्याची राजधानी याच तालुक्यात पणजी आहे. विविध पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे, पुरातन मंदिरे, मठ, ग्रंथालये याच तालुक्यात आहेत. तेव्हा या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, असे जाणकारांचे मत आहे.

या तालुक्यात गोव्याची राजधानी पणजीसह अंदाजे २२ गावांचा समावेश मोडतो. यात ताळगाव, बांबोळी, आगशी, जुने गोवे, करमळी, पिलार, गोवा वेल्हा, आजोशी मंडूर, कुडका मेरशी, सांताक्रुझ, रायबंदर आदी भागांचा समावेश होतो. 

राजधानी पणजी सोडल्यास तिसवाडीतील बरेच गाव दुर्लक्षित राहिले, असे स्थानिक लोक पोटतिडकीने बोलतात. त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक पदवीधर बेकार जीवन जगतात. सरकारी नोकऱ्यासाठी धडपड करतात. कोणीही गॉड फादर नसल्याने नोकऱ्या मिळणे कठीण होऊन बसले आहे. साध्या नोकऱ्या मिळत नाहीत. नोकऱ्यांसाठी अर्ज करून थकलो असल्याचे बरेच अर्जदार सांगतात.प्रत्येक पदासाठी लाखो रुपयांचे दर ठरलेले असतात.यासाठी मोठी रक्कम भरून सरकारी नोकरी पदरी पाडून घेणे गरीब उमेदवारांच्या आवाक्याबाहेरचे असते.

सध्या पणजी ते आगशी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्ता रुंदीकरण,नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम तसेच आगशी कुठ्ठाळी जलमार्गावरील नवीन पुलामुळे वाहतुकीची कोंडी होते. प्रवासी वर्गाला तासन्‌तास अनेकांना वाहनांतच तिष्ठत बसावे लागते. लोकांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. येथील काम युद्ध पातळीवर चालू असले असले तरी गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ प्रवाशांचे हाल झाले. अजूनही ही डोकेदुखी थांबलेली नाही. या मार्गावरील हे काम पूर्ण व्हायला पुढील दोन वर्षांचा काळ सहज लागेल. तोपर्यंत प्रवासी वर्गाला ही डोकेदुखी बनून राहणार आहे, असे या राष्ट्रीय महा मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे.

वैद्यकीय इस्पितळासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर रात्री, बेरात्री व सकाळी उशिरापर्यंत भटकी जनावरे ठाण मांडून बसलेली दिसतात. त्यांचे शेण आणि लघवी यांची दुर्गंधी असह्य होते. यावर नियंत्रण नसल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवासी वर्गाला दररोज या समस्येतून जावे लागते.

मेरशी-सांतक्रुझ ते आगशीपर्यंत नवीन उड्डाण पूल व नवीन पुलाचे काम चालू असल्याने राष्ट्रीय महामार्गाची दैना झाली आहे.जीव मुठीत धरून प्रवास करण्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याने दिवसेंदिवस प्रवासाचे हाल होत असल्याने ही मोठी समस्या बनून राहिली आहे.

एक काळ असा होता, तिसवाडी तालुका शेती व्यवसायासाठी संपूर्ण गोव्यात प्रसिध्द होता. आता ती परिस्थिती राहिली नाही. या तालुक्यातील अनेक खाजन जमिनीतील पारंपरिक शेती नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. यास कारणीभूत कोण आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे. बांध फोडून शेत जमिनीत खारे पाणी घेऊन मत्स्योपादन करणे हा खाजन समितीचा मुख्य हेतू बनून राहिला होता.शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा झाला नाही, पण समितीवरील काही लोक मात्र गब्बर झाले. 

यामुळे शेती व्यवसायाला वाईट दिवस आले. यामुळे गेली २५ वर्षें या भागात पारंपरिक शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. याला कांही खाजन शेत जमिनीचे शेतकरी यास अपवाद आहेत. यानंतर पुढे हा शेती व्यवसाय सुरू होईल की, नाही हे सांगणे कठीण आहे, असे जाणकार शेतकऱ्यांनी आपली व्यथा बोलून दाखविली.

 सरकारने हा शेती व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्यास हा व्यवसाय दिमाखात उभा राहील.

या तालुक्यात अनेक लहान मोठ्या समस्या आहेत. यात वीज,   पाणी, गटारे, ओला व सुका कचरा यांचा समावेश आहे प्रत्येक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यास, निर्माण झालेल्या येथील समस्या सुटू शकतील.पंचायत हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतील.

संबंधित बातम्या