गोवा खाणकामबंदीचा आदेश देताच महसूल नीचांकी पातळीवर घसरला

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

खाणबंदीमुळे बंदरातून प्राप्त होणाऱ्या महसुलावर विपरीत परिणाम झाला असल्याचे गेल्या आठ वर्षांमधल्या प्रचंड प्रमाणात घटलेल्या महसुलातून स्पष्टपणे सिद्ध होत आहे.

पणजी : खाणबंदीमुळे बंदरातून प्राप्त होणाऱ्या महसुलावर विपरीत परिणाम झाला असल्याचे गेल्या आठ वर्षांमधल्या प्रचंड प्रमाणात घटलेल्या महसुलातून स्पष्टपणे सिद्ध होत आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये खाणबंदीनंतर बंदरातून मिळणारा महसूल जो घटला तो आजतागायत वाढलेला नाही. २०१२ आणि २०१८ मध्ये खाणबंदी झाली व त्याचा प्रचंड वाईट परिणाम एकंदर राज्याच्या महसुलप्राप्तीवर आणि बंदरातील आर्थिक उलाढालीवर तसेच राज्य सरकारच्या तिजोरीवरही झाल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते.
२०१२ साली सप्टेंबर महिन्यापर्यंत पोर्ट अथवा बंदर खात्याचा वार्षिक महसूल ४० कोटी रुपये एवढा होता.

ऑक्टोबरच्या आसपास सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदीचा आदेश जारी केल्यानंतर राज्यात खाणबंदी झाल्यावर हा महसूल एका झटक्यात नीचांकी पातळीवर घसरून खाली आला. गेल्या आठ वर्षात फारच कमी प्रमाणात महसूल गोळा होत असून २०१२ पूर्वी ज्या प्रचंड प्रमाणात महसूल गोळा होत होता, त्याच्या निम्म्या प्रमाणातही सध्या महसूल गोळा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

एका बंदर अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे सध्या येणारी मिळकत वा महसूल ७ ते ८ कोटींच्या आसपास आहे आणि जोपर्यंत खाण व्यवसाय पूर्णपणे जोमात सुरू होत नाही, तोपर्यंत महसुलामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ पूर्वीसारखी होणार नाही.  अधिकाऱ्याचे असेही म्हणणे आहे की बंदर खात्याने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी इतर स्रोतांमधून महसूल मिळावा म्हणून प्रयत्न केला, पण हा महसूलही अपुरा पडत आहे. खाणविषयक निर्यात आणि वाहतूकही काही प्रमाणात सध्या होत आहे, पण २०१२ पूर्वी जो व्यवसाय व उलाढाल होत होती, त्याच्या तुलनेत सध्याचे काम २० टक्केही होत नाही, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

त्यांनी याविषयी अधिक सखोल माहिती देताना सांगितले की खाण व्यवसायावर बंदी लादली गेल्यापासून आणि त्याचा परिणाम म्हणून खनिज वाहतूकही ठप्प झाल्यापासून समुद्रमार्गे होणारी खनिजाची वाहतूक जवळपास बंद झाली आहे आणि इतर जहाजांची रहदारी व वाहतूक सागरी मार्गांवर वाढली आहे. काही बार्जमालक जे पूर्वी पूर्णपणे खनिज वाहतुकीवर अवलंबून होते त्यांनी आता क्रूझ जहाजांचा वापर पर्यटन व्यवसायात करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. या विभागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध असून गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये या व्यवसायात जे उतरले आहेत त्यांनी चांगला व्यवसाय केला आहे. अपवाद आहे तो फक्त या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळाचा कारण या काळात सर्व बंद होते. कोविडमुळे ही परिस्थिती ओढवली, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या