म्हापसा मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित करा- सुधीर कांदोळकर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

येथील मलनिस्सारण प्रकल्पाची पाइपलाईन घालण्यासाठी आतापर्यंत सुमारे ८० कोटी रुपये खर्च झालेला आहे. या शहरासाठी ‘जायका’च्या सहकार्याने जलनिस्सारण प्रकल्पाचे काम करण्यात आले असले, तरी हे काम अजूनही अर्धवट आहे. 

म्हापसा- म्हापशातील मलनिस्सारण प्रकल्प त्वरित कार्यान्वित करावा. पैशांचा योग्य विनियोग करावा, अशी जोरदार मागणी म्हापसा पालिकेतील एक ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. या कामाची पूर्ती करण्याबाबत राज्य सरकारने गांभीर्य दाखवावे व तसे झाल्यास येत्या पाच-सहा महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केला जाऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.

यासंदर्भात श्री. कांदोळकर पुढे म्हणाले, की म्हापसा येथील मलनिस्सारण प्रकल्पाची पाइपलाईन घालण्यासाठी आतापर्यंत सुमारे ८० कोटी रुपये खर्च झालेला आहे. या शहरासाठी ‘जायका’च्या सहकार्याने जलनिस्सारण प्रकल्पाचे काम करण्यात आले असले, तरी हे काम अजूनही अर्धवट आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारचे ८० कोटी रुपये जमिनीखाली घातले गेले आहेत, असेच म्हणावे लागेल. परंतु त्या प्रकल्पाचा सध्या काहीच उपयोग नाही.

येथील तार नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने गणेशमूर्ती विसर्जन करण्यास गणेशभक्तांनी नकार दिला होता. नदीवरील पाइपांचा पूल काढल्यास पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल, असा दावा अनेकांनी केल्याने सध्या पाईप्स काढून काँक्रीटचा पूल बांधण्यात येत आहे. त्याबद्दल श्री. कांदोळकर यांनी सरकारचे अभिनंदन केले. परंतु शहरातील सांडपाणी व शौचालयातील मळ नाल्यांच्या माध्यमातू् तार नदीत सोडला जात असल्याने, तार नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित केल्याविना सुटूच शकत नाही, असा दावा श्री. कांदोळकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, की मलनिस्सारण प्रकल्पाचे  ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. खतनिर्मितीचा प्लांटही तयार आहे. फक्त वाहिन्यांच्या चेंबर्सना गळती लागल्याने पुन्‍हा तपासणी करुन घराघरातील शौचालयांच्या टाक्यांपर्यंत जोडणी तेवढी करुन घ्यायची आहे. सरकारने हे काम करण्यासाठी त्वरित पावले उचलल्यास नदीच्या पात्रात कसलीच घाण जाणार नाही. नदीचं पात्र गणेशमूर्ती विसर्जनास व इतर धार्मिक कार्यास उपयुक्त ठरेल.  

प्रदूषित पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करण्यात येतात. हे थांबवण्यासाठी अपूर्णावस्थेत असलेला मलनिस्सारण प्रकल्प सुरू करण्याची नितांत गरज आहे, असे श्री. कांदोळकर म्‍हणाले.

कळंगुट मतदारसंघात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण करुन घेण्यासाठी तेथील आमदार तथा मंत्री मायकल लोबो सक्रीयपणे वावरत आहेत. परंतु म्हापशात मात्र सगळा ठणठणाट आहे, असा टोला त्यांनी हाणला.

संबंधित बातम्या