एकमेका सहाय्य करू..!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोव्‍यातील तब्बल ११ हजार ४०० महिला उद्योजिका एकत्र आल्या आहेत. सोमवारी त्यांच्या या स्वप्नाला पंखाचे बळ देणाऱ्या ‘गोयकार्ट’ या ॲपचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे

पणजी : ‘एकमेका साह्य करू अवधे धरू सुपंथ’, ‘नाही सहकार नाही उद्धार’ हे सुविचार ऐकायला बरे वाटतात. या उक्तीप्रमाणे वागत एकत्र येत जगाला गवसणी घालण्याचे स्वप्न मात्र काहींनी पाहिले आहे. यासाठी थोड्या थोडक्या नव्हे, गोव्‍यातील तब्बल ११ हजार ४०० महिला उद्योजिका एकत्र आल्या आहेत. सोमवारी त्यांच्या या स्वप्नाला पंखाचे बळ देणाऱ्या ‘गोयकार्ट’ या ॲपचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला पूरक अशी स्वयंपूर्ण गोवा ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सध्या ते जातील तेथे आपल्या स्थानिक गरजा गोमंतकीय उत्पादनांतूनच भागल्या पाहिजेत यावर भर देत आहेत. यालाच पूरक अशी कृती करत या महिलांनी कोविड काळात १५ लाख रुपयांचा व्यवसाय विविध उत्पादने आणि सेवांच्या माध्यमातून केला आहे. आजवर फेसबुकवरील बंदिस्त गटातच हा व्यवसाय व या सेवांची उपलब्धता केली जात होती. आता या उद्योजकतेला गगन भरारीसाठी त्यांनी सज्ज केले आहे. त्यांना लागणारे प्रशिक्षण सरकार देणार आहे.

कोविड महामारीतही १५ लाखांची उलाढाल
महिलांनी एकत्र येत ॲप तयार केले आहे. याविषयीची मूळ संकल्पना ही सिया शेख (म्हापसा) यांनी मांडली. मडगाव येथील डॉ. स्नेहा भागवत, पर्वरी येथील मधुमिता बचपन आणि म्हापसा येथील मोक्षा खेतान यांची जोड मिळाली. त्यांना कुशा नायक (मडगाव) या मदत करत आहेत. त्यांनी सुरवातीला विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांचे एकत्रीकरण केले. त्यांचा फेसबुक गट तयार केला. एकेक महिला त्यात सहभागी होत गेली आणि आकडा ११ हजार ४०० वर पोहोचला. याच काळात कोविड महामारीने सर्व जग बंद केले. व्यवसाय बंद पडतात की काय अशी स्थिती आली मात्र ११ हजार ४०० हक्काचे ग्राहक त्या गटात असल्याने त्यांनी एकमेकांकडील वस्तू व सेवा घेत एकमेकांना आधार दिला. १५ लाख रुपयांची उलाढाल या गटाने या काळात केली.

मिळून साऱ्याजणी स्‍वयंपूर्ण होऊया!
केवळ या गटातील महिलांनाच या उत्पादन व सेवांविषयी आजवर माहिती होती. सुरवातीला देशभरात व नंतर जगभरात ही उत्पादने व सेवा पोचल्या पाहिजेत तर ॲप तयार करण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन या महिलांनी स्वतःच गुंतवणूक करून ॲप तयार करून घेतले. घरच्या घरी तयार केली जाणारी उत्पादनेच या महिला विकतात असे नव्हे. काहींनी अनेक कंपन्यांच्या एजन्सी घेतल्या आहेत. कंपन्यांच्या वितरकाची जबाबदारी त्या निभावत आहेत. काही सेवा क्षेत्रात आहेत. या साऱ्याजणी मिळून स्वयंपूर्ण गोवा बनवतानाच आपला व्यवसाय देश आणि जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न बाळगून आहेत. त्या स्वप्नाला बळ देणारे ॲप सोमवारी अधिकृतपणे सुरू झाले की आपल्या व्यवसायाला सीमांचे बंधन असणार नाही, हे त्यांना पक्के माहित आहे..

संबंधित बातम्या