पणजी महापालिकेत ‘ताळगाव’चा समावेश?

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

पणजी महापालिकेच्या येत्या निवडणुकीआधी ताळगाव पंचायत क्षेत्र पणजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

पणजी : पणजी महापालिकेच्या येत्या निवडणुकीआधी ताळगाव पंचायत क्षेत्र पणजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सरकारच्या मान्यतेसाठी तो सादर करण्यात आल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप त्याविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ताळगाव पंचायत क्षेत्र पणजी महापालिकेत समाविष्ट केल्यास कराव्या लागणाऱ्या प्रभाग फेररचनेची तयारीही करण्यात आली आहे. सध्या पणजी महापालिकेचे ३० प्रभाग आहेत ती संख्या वाढून ५० होणार आहे. पणजी महापालिकेच्या सध्याच्या मंडळाची पाच वर्षाची मुदत संपण्यास आली आहे. त्याचमुळे ११ पालिकांच्या निवडणुकीसोबत पणजी महापालिकेचीही निवडणूक घेण्याची तयारी करण्यात येत आहे.  याच दरम्यान पणजीच्या प्रभाग फेररचनेची तयारी मार्गी लागू शकते.

ताळगाव पंचायत क्षेत्र १९९६ दरम्यान पणजी पालिकेचे भाग होते. त्यानंतर ताळगाव पंचायत स्थापन करून तो भाग पालिका क्षेत्रातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पणजी पालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले. आता पुन्हा ताळगावच्या समावेश पणजी महापालिकेत करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र निवडणूक तोंडावर आल्याने हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता फार धुसर आहे. मात्र सरकारी पातळीवर हा विषय चर्चेला येणार आहे.
दरम्यान सरकारने पाच पालिकांतील प्रभाग वाढवण्याचे ठरवले आहे. डिचोलीत १२ वरून १४, कुंकळ्ळीत १२ वरून १४, कुडचड्यात १४ वरून १५, केपे पालिकेत ११ वरून १३ आणि काणकोणमध्ये १० वरून १२ प्रभाग करण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या