भाजपच्या काळात गुन्हेगारीत वाढ

 Increase in crime during BJP rule
Increase in crime during BJP rule

म्हापसा : गोवा राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. पर्वरी येथे दिवसाढवळ्या माहिती हक्क कार्यकर्ता विलास मेथर याला जाळून खून करण्याची घटना घडली. पर्वरीच्या आमदाराचे मित्र शैलेश शेट्टी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्यामुळे या प्रकरणातील मास्टर माइंड कोण, हे गृह खात्याने व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अजून उघड का केले नाही, असा दावा पर्वरी गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष अॅड. शंकर फडते यांनी करीत भाजपच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

उत्तर गोवा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत जिल्हा अध्यक्ष विजय भिके, सरचिटणीस भोलानाथ घाडी उपस्थित होते.
ॲड. फडते म्हणाले, पर्वरीचे आमदार म्हणतात की शैलेश शेट्टी हा माझा कालचा आणि आजचा मित्र आहे आणि सदैव मित्रच राहील. आरोपी शेट्टी पर्वरी युवा कल्याण विश्वस्त मंडळाचा सदस्य आहे आणि हे विश्वस्त मंडळ पर्वरीचे आमदार चालवतात. पर्वरी मतदारसंघातील उब्रा या साल्वादोर–द-मुंद या गावात कुणी येवून गुन्हा करू शकत नाही. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय मोठे गुन्हे होत नाहीत. शैलेश शेट्टी यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे पोलिसांना अधिक चौकशी करायची नाही. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे हे प्रकरण बंद करण्याची तयारी आहे. त्यामुळे आणखीन कोणाला अटक होणार नाही, असे सूचित होते. बिल्डर, पंचायत व आमदार यांचे साटेलोटे आहे व त्यांचे जवळचे संबंध आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. शैलेश शेट्टी यांची चौकशी पूर्ण होऊनसुद्धा पोलिसांना मुख्य आरोपी सापडत नाही.


या प्रकरणात एक वजनदार राजकीय व्यक्ती आरोपींच्या मागे खंबीरपणे उभी आहे. पर्वरी येथे काही घडल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आवाज उठविणारा हा राजकीय पुढारी या प्रकरणात गप्प का? विलास मेथर प्रकरणी त्यांच्याडून अजूनही एकही शब्द आला नाही. या बाबतीत कमालीची शांतता पाळली आहे. पर्वरी येथील सरपंच, पंच मंडळींनी डॉ. ऑलाव याच्यावर झालेल्या प्रकरणात मोर्चा काढले पण आता विलास मेथर प्रकरणात ही सर्व मंडळी कुठे गेली, असा सवाल ॲड. फडते यांनी उपस्थित केला.
जळीतकांड घडून प्रमुख आरोपीस अटक न झाल्याने पर्वरी येथील लोक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. स्वत:च्या मुलांच्या जीवनाची ते काळजी करतात. पत्नी स्वत:च्या पतीची, तर व्यवसायिक आपल्या व्यवसायाची चिंता करतात. अशा प्रकारची दहशत पर्वरीच्या राजकरण्याचा आहे म्हणून सगळे शांत राहून या प्रकाराकडे पाहतात.

विलास मेथर प्रकरणावर म.गो., गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी मूग गिळून गप्प बसले आहेत, असा आरोप करून त्याबद्दल फडते यांनी आश्चर्य व्यक्त केले.
उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यांनी सांगितले, उत्तर गोव्यातील किनारी भागांत वेश्या व्यवसाय व अमली पदार्थ विक्री जोरात चालू आहे. स्वत:कडे सर्व पुरावे आहेत, असे खुद्द मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले होते. 
गुन्हा अन्वेषण खात्याने त्यांच्याकडून पुरावे घेऊन कारवाई करावी; तसेच, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना बोलवून घेऊन मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी व गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालावा, अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com