राज्यातही ३१ मे पर्यंत टाळेबंदीत वाढ

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी हे सर्व रुग्ण रेल्वेने गोव्यात आलेले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू साथीच्या सामुदायिक प्रसारची भीती नाही.

पणजी, 

‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारिणीने टाळेबंदीमध्ये चौथ्यांदा वाढ करून ती ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने गोव्यातही ही टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या टाळेबंदीसंदर्भातची मार्गदर्शक सूचना उद्या (१८ मे) संध्याकाळपर्यंत घोषित करून त्यामध्ये आणखी काही शिथिलता करण्यात येईल. पुढील आठवड्यापासून राजधानी एक्स्प्रेस गोव्यात थांबा घेणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी हे सर्व रुग्ण रेल्वेने गोव्यात आलेले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू साथीच्या सामुदायिक प्रसारची भीती नाही. प्रवेशानंतर लगेच या प्रवाशांची चाचणी केली जात असल्याने प्रसार होण्याची शक्यता अंधूक आहे. आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८वर पोहोचली असून ती संध्याकाळपर्यंत दिल्लीहून रेल्वेने प्रवासी येणार असल्याने त्यात आणखी ३ -४ रुग्णांची वाढ होऊ शकते. जे प्रवासी राजधानी एक्स्प्रेसने आले होते त्यामधीलच हे रुग्ण सापडले आहेत. थिरुवनंतपूरमहून मडगावला उतरलेल्या प्रवाशांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. थिरुवनंतपूरम रेल्वे मात्र मडगाव येथे थांबा घेणार आहे. ज्या ठिकाणी रेल्वे थांबा घेणार आहेत, तेथे प्रवाशांची तपासणी करण्याबरोबरच अधिक सतर्कता राखण्याची गरज आहे, असे डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दिल्लीहून रेल्‍वेने आलेले ९० टक्के गोमंतकीय
गोव्यात दिल्लीहून रेल्वेतून आलेले ९० टक्के प्रवासी हे गोमंतकीय होते. त्यांच्याकडे आधार कार्ड तसेच ओळखपत्र होते. बिगर गोमंतकीय तसेच सरकारी कर्मचारी वगळता जे कोणी रेल्वे, विमान, वाहन किंवा बोटीने गोव्यात येतील त्यांना कोविड चाचणी सक्तीची केल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोविड चाचणीसाठी प्रत्येकी २ हजार रुपये शुल्क आकारले जातील. तसेच त्यांना १४ दिवस घरी विलगीकरण केले जाणार असल्याची माहिती रेल्वेमार्फत प्रवाशांना देण्यात आल्यावर त्यातील अर्धेअधिक प्रवासी कमी झाले होते. यासंदर्भात गृह व रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून त्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वे थांबा येथील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

वाहनचालकांची तपासणी
राज्यात प्रवेश करणाऱ्या मालवाहू ट्रक बंद करणे शक्य नाही. मात्र, ट्रक चालकांची थर्मल गनने तपासणी केली जाते. हल्लीच जी प्रकरणे समोर आली आहेत त्यावरून या चालकांबाबत संशय आल्यास त्यांचीही चाचणी करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली जाईल. मडगाव कोविड इस्पितळ हे शंभर खाटांचे असून आणखी त्यात ६० खाटा वाढवता येणे शक्य आहे. २० ते २५ व्हेंटिलेटर्सची सोय असून गरज लागल्यास त्यात वाढ करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. राज्यात येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवल्यास कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू शकणार नाही. सध्या दाखल असलेल्या १८ कोरोना बाधित रुग्णांपैकी १६ जणांची स्थिती चांगली असून इतर दोघांवर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

परीक्षेवेळी सावधगिरी
घेण्‍याचे निर्देश
दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत तर त्या ठरल्यानुसार होतील. विद्यार्थ्यांच्या बहुतेक पालकांना या परीक्षा झालेल्या हव्या आहेत. कोरोना विषाणू साथीचा प्रसार होण्याची शक्यता नाही, कारण प्रवेश करणाऱ्यांची प्रवेशाच्या ठिकाणी चाचणी केली जाते. परीक्षेवेळी सामाजिक अंतर ठेवण्याबाबत काळजी घेतली जाणार आहे. या सामाजिक अंतरामुळे सुमारे २४६० परीक्षा केंद्रे नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये परीक्षा केंद्र आहे, असे ते म्हणाले. गेल्या २९ एप्रिलपासून १७ हजार ८५ लोक गोव्याबाहेर गेले आहेततर २१२९ लोकांनी गोव्यात प्रवेश केला आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान खात्याने दिली आहे.

संबंधित बातम्या