मडगावात गस्त वाढवून सराईत गुन्हेगारांवर नजर: पोलिस अधीक्षक महेश गावकर

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

पोलिस अधीक्षक महेश गावकर यांची माहिती

मडगाव:  सराफी व्यवसायिक स्वप्नील वाळके यांच्या दिवसाढवळ्या घडलेल्या खून प्रकरणामुळे मडगाव शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेले भितीचे वातावरण दूर करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेश गावकर यांनी दिली.

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग हे रजेवर गेले असून या पदाचा ताबा पोलिस अधीक्षक महेश गावकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. स्वप्नील वाळके यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळाबंद घालण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. पदाचा ताबा घेतल्यानंतर लगेच त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विषयाचे गांभीर्य मांडले व मार्गदर्शन केले. 

दक्षिण गोव्यातील सराईत गुन्हेगारांवर पोलिस नजर ठेवणार आहेत. त्यांचा ठावठिकाणी व हालचालीवर लक्ष ठेवण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती गावकर यांनी दिली. 

स्वप्नील वाळके यांच्या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे भितीचे वातावरण दूर करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. 

पोलिस मडगवात आता दिवसरात्र गस्त घालत आहे. मार्केटसह मध्यवर्ती भागात आठ पोलिस सतत गस्त घालत आहेत, असे गावकर यांनी सांगितले. 

शहरातील सीसी टीव्हीच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना कऱण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या