मगरींचा अधिवास होतोय नष्ट; वाढत्या प्रदूषणाचा परिणाम

मगरींचा अधिवास होतोय नष्ट; वाढत्या प्रदूषणाचा परिणाम
CROCODILE.jpg

पणजी: मानव आणि प्राणी यांचे नाते सांगणारा ‘मानगे थापणे’ ( मगरीची पूजा) सारखा विधी फोंडा तालुक्यातील काही गावांमध्ये पाहायला मिळतो. तर दुसरीकडे मोठमोठे विकास प्रकल्प आणि वाढते प्रदूषण यामुळे मगरींचा अधिवास नष्ट होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच मगरींचे स्थलांतर होताना दिसते. (Increasing pollution is destroying crocodile habita in goa)

नेवरा आणि डोंगरी या गावांतील बांधजवळ 20 ते 25 मगर पाहायला मिळायचे. या ठिकाणी आता नवीन रस्ता बांधला आहे. या नवीन रस्त्यामुळे मगरींचे स्थलांतर झाले असून येथे आता एकही मगर पाहायला मिळत नाही. याचप्रकारे झुआरी पुलाच्या कामामुळे तेथील मगरींचे अधिवासही धोक्यात आहे. वर्षभरापूर्वी दाभाळाला मगरींचे ठिकाण म्हणून जाहीर करण्यात आले होते. परंतु, आता तेथे नवीन पूल उभारल्यामुळे त्यांचे अधिवास नष्ट झाल्याची माहिती ‘मगर टेल्स’चे चरण देसाई यांनी दिली.

दरम्यान, विकास प्रकल्प आणि प्रदूषण मगरींच्या अधिवासाच्या मुळावर आली आहे. तर दुसरीकडे मासे पकडण्यासाठी असलेली जाळी आणि वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले सापळे त्यांना घायाळ करीत आहेत. राज्यातील वनखाते आणि अनेक स्वयंसेवकांनी मिळून अशा अनेक घायाळ मगरींचे प्राण वाचवले आहेत.

अभ्यासासाठी खास व्हिडीओ फुटेज

मगरीचे घरटे, मगरींच्या पिल्लांचे भक्षक, अंडीतून पिल्ले केव्हा बाहेर पडतात, मादी आपल्या पिल्लांची कशी निगा राखते या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मगर टेल्सने एप्रिल मे दरम्यान मडकई आणि चोडण येथील चार ठिकाणी कॅमेरे लावले होते. यातून त्यांना खास माहिती आणि उपयुक्त असे व्हिडिओ फुटेज मिळाले. याबाबत देसाई म्हणाले, सहसा मार्च महिन्याच्या अखेरीस मगरी अंडी घालतात आणि मॉन्सूनचा पहिला वर्षाव झाला की, पिल्ले अंडीतून बाहेर पडतात. मादी स्वतःच आपल्या तोंडाने अंडी फोडते आणि पिल्लांना पाण्यात जाऊन सोडते. परंतु, यावेळी एका ठिकाणी पिल्ले अंड्यातून आधीच बाहेर पडलीत. याचे कारण जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे. याशिवाय मगरींच्या पिल्लांना मुंगूस, घोरपड आणि गिधाड खातानाचे व्हिडीओ फुटेज मिळाले आहे.

मगरींसाठी पोषक वातावरण

गोड्या पाण्यात सहसा मगरींचे अधिवास असतो. मात्र, काही ठिकाणी सेमी सलाईन पाण्यामध्ये देखिल ते आढळतात. याप्रकारचे उदाहरण गोव्यातच पाहायला मिळते. कुंभारजुवे कालव्यात आढळणाऱ्या मगरींचे वास्तव्य सेमी सलाईन पाण्यातच आहे. अतिथंड वातावरणात मगरी राहू शकत नाहीत.  ते प्रामुख्याने मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी खातात.

मगर टेल्स’चा अभ्यास

गेल्या पाच वर्षांपासून ‘मगर टेल्स’ मगरीसंबंधी गोष्टींवर संशोधन करीत आहे. फोंडा, दाभाळ, करमळी, धामशे आणि डिचोली अशा भागांमध्ये त्यांनी मगरींच्या वास्तव्याचे अभ्यास केलेले आहे. या अभ्यासादरम्यान मगरींच्या वास्तव्याच्या ठिकाणी प्लास्टिक प्रदूषण वाढल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य धोक्यात आले. अशी माहिती ‘मगर टेल्स’च्या गायत्री बखले यांनी दिली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com