पणजीत आझाद मैदानावर जीवरक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू

दैनिक गोमंतक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

संतप्त बनलेल्या जीवरक्षकांनी बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेत पणजीत आझाद मैदानावर जमले. तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती संघटनेच्या स्वाती केरकर यांनी दिली.

 

पणजी: गेल्या १४ महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या जीवरक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा यांना आज संध्याकाळी गोवा जीवरक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेटून विचारणा केली असता न्याय मिळत नसल्यास मजूर आयुक्तांकडे जाऊन प्रश्‍न मांडा वा नव्याने निवेदन द्या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त बनलेल्या जीवरक्षकांनी बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेत पणजीत आझाद मैदानावर जमले. तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती संघटनेच्या स्वाती केरकर यांनी दिली.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक आज पणजीतील पर्यटन भवन येथील पर्यटन संचालकांना भेटण्यास गेले असता सरकारी बैठकांमुळे ते भेटू शकले नाहीत. त्यांनी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर भेटण्याची वेळ दिल्याने या जीवरक्षकांनी त्यांना भेटल्याशिवाय न जाण्याचा पवित्रा घेतला. या गोवा जीवरक्षक संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी संचालकांकडून भेट देण्यास होत असलेल्या टोलवाटोलवीबद्दल खंत व्यक्त केली. जोपर्यंत संचालक भेटत नाहीत, तोपर्यंत तेथून हटणार नाही. गेले १४ महिने २५० जीवरक्षक बेरोजगार आहेत. त्यांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडाळात सामावून घेण्याचे सरकारने आश्‍वासन दिले. मात्र, दुसऱ्या बाजूने दृष्टी कंपनीबरोबर नवा करार करून नव्या जीवरक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. दृष्टीने त्यासाठी जाहिरातही दिली आहे. त्यामुळे या जीवरक्षकांचे पुढे काय असा प्रश्‍न केरकर यांनी उपस्थित केला. 

एक वर्षापूर्वी पर्यटन संचालकांना या संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. दृष्टी कंपनी कंत्राटी जीवरक्षकांच्या जीवाची पर्वा करत नाही, पुरेशा साधन सुविधा देत नाही असा आरोप करून त्यांनी गेल्यावर्षी आंदोलन केले‌ होते. त्यावेळी त्यांनी त्यावर अभ्यास करतो असे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली तेव्हा त्यांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामध्ये घेतले जाईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र महामंडळाकडून गेल्या वर्षभरात नोकरभरतीच झाली नाही. दृष्टी कंपनीने ‘लाईफ सेव्हर्स’ या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. पदवीधरांना २५ हजार तर पदव्युत्तरांना ३० हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. जीवरक्षकांना दृष्टी कंपनीने कधीच १५ हजारापेक्षा अधिक वेतन दिले नाही. या प्रशिक्षित जीवरक्षकांना डावलून नवीन भरती करण्याचा कंपनी व सरकारचा छुपा डाव असल्याचा आरोप केरकर यांनी केला.

संबंधित बातम्या