म्हापसा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे निष्कलंक व्यक्तिमत्त्व असून ते या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी बहुतांश भारतीयांची इच्छा आहे, असे उद्गार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी काढले. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त म्हापसा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी श्री. डिसोझा यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव गाब्रियल फर्नांडिस, म्हापसा गट अध्यक्ष ॲड. गौतम पेडणेकर, तसेच अन्य पदाधिकारी दिगंबर शिरोडकर, सय्यद गौसपीर उपस्थित होते.
शरद पवार हेच खरे भारताचे लोकनेते -
या कार्यक्रमात नाट्यकलाकार पांडुरंग कोरगावकर, कोरीवकाम करणारे कलाकार हाजीसाब, गरिबीत दिवस काढूनही मुलाबाळांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देणाऱ्या लीलावती तुयेकर, काबाडकष्ट करून घरसंसार चालवणाऱ्या मंजुळा वाल्मिकी, तांब्याचे भांड्यांचे कारागीर संजीव तिवरेकर, सुहास धुरी अशा समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संजय बर्डे म्हणाले, की शरद पवार हे या देशातील एकमेव नेते आहेत, ज्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तराववर दीर्घकाळ जनमानसात मानसन्मान प्राप्त झालेला आहे. दूरदृष्टी असलेल्या या नेत्याकडे माणसे ओळखण्याचे कसब असून कित्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही ते नावांनिशी ओळखतात, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
सध्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने पवारसाहेब कार्यरत असून शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या तीन विधेयकांना त्यांनी जोरदार विरोध केला आहे, असे श्री. बर्डे म्हणाले. भाजपचे नेते प्रकाश जावडेकर म्हापशात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा त्या विषयासंदर्भात निषेध करण्याचे धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोव्यातील कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी दाखवले होते, असेही त्यांनी नमूद केले.
आणखी वाचा:
दक्षिण गोव्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला -
श्री. डिसोझा पुढे म्हणाले, की पवारसाहेबांना या देशातील गोरगरीब जनतेचे स्मरण आहे. आज त्यांचे वय ऐंशी असतानाही ते देशाच्या राजकारणात नवतरुणासारखे क्रियाशील आहेत. रात्री उशिरा झोपून व सकाळी लवकर उठून जनतेची कामे करण्यास ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणवैशिष्ट्य म्हणजे ते वेळेला नेहमीच महत्त्व देत आले आहेत. अशा या थोर व्यक्तीची आगामी निवडणुकीत देशाच्या पंतप्रधानपदी निवड व्हावी या दृष्टीने जनतेने डोळसपणे मतदान करावे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बर्डे व दिगंबर शिरोडकर यांनी केले. सत्कारमूर्तींच्यावतीने पांडुरंग कोरगावकर व सुहास धुरी यांनी मनोगते व्यक्त केली. पांडुरंग कोरगावर म्हणाले, की आम्ही शरद पवारांना गेली कित्येक दशके ओळखतो. त्यांचा पक्ष शेतकऱ्यांचे हितरक्षण करणारा आहे, याची जाणीव आम्हाला सदैव आहे.