पंतप्रधानांपेक्षा सनदी लेखापालांची स्वाक्षरी अधिक वजनदार राज्यमंत्री श्रीपाद नाईकांचे उद्‍गार

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

देशाची अर्थव्यवस्था उद्योगांतूनच बळकट होऊ शकते. उद्योग व्यवसायाचे आर्थिक गणित हे सनदी लेखापालच योग्यरीत्या मांडू शकतात. या पद्धतीने देश उभारणीत सनदी लेखापालांचे योगदान मोठे असते.

पणजी: देशाची अर्थव्यवस्था उद्योगांतूनच बळकट होऊ शकते. उद्योग व्यवसायाचे आर्थिक गणित हे सनदी लेखापालच योग्यरीत्या मांडू शकतात. या पद्धतीने देश उभारणीत सनदी लेखापालांचे योगदान मोठे असते. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा पंतप्रधानांच्या स्वाक्षरीपेक्षा सनदी लेखापालांची स्वाक्षरी अधिक वजनदार असते असे म्हणतात, असे उद्‍गार केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटच्या पश्चिम विभागीय पातळीवरील उपविभागीय परिषदेत ते बोलत होते. आभासी पद्धतीने आयोजित या परिषदेत गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रातील सनदी लेखापाल सहभागी झाले होते. गोवा शाखेने या परिषदेचे आयोजन केले होते. या शाखेच्या अध्यक्ष वर्षा देशपांडे यांनी परिषदेत सर्वांचे स्वागत केले. 

इन्सिस्ट्यूटचे अध्यक्ष ललीत बजाज यांनी सनदी लेखापाल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गिरीश आहूजा यांनी करातील नवे बदल, संयुक्त विकास करार, कर परतावा आदी विषयांत झालेले बदल याविषयी मार्गदर्शन केले. निरंजन जोशी व धनंजय गोखले यांनी लेखापरीक्षणाची गुणवत्ता याविषयी सर्वांना अवगत केले. अविनाश पोद्दार यांनी वस्तू व सेवा कर प्रणाली आणि कारण दाखवा नोटीशीचे विश्लेषण याविषयी आपली मते व्यक्त केली. परिषदेचे संचालन थॉमस आंद्रादे यांनी केले तर उल्हास धुमास्कर यांनी आभार  मानले.

आणखी वाचा:

गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी दिले निमंत्रण -

भाजप सरकारने गोव्याला दिवाळखोर केले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत -

संबंधित बातम्या