'कोविड’ संकटात जनतेच्या मानगुटीवर महागाईचे ‘भूत’

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

सध्या महागाईने कळस गाठला असून, महागाईत जनता पुरती भरडली जात आहे. एकाबाजूने ‘कोविड’ महामारीचे संकट तर दुसऱ्याबाजूने महागाईचे चटके सोशीत  कठीण परिस्थितीत सामान्य जनता दिवस कंठत आहेत. ​

डिचोली:  सध्या महागाईने कळस गाठला असून, महागाईत जनता पुरती भरडली जात आहे. एकाबाजूने ‘कोविड’ महामारीचे संकट तर दुसऱ्याबाजूने महागाईचे चटके सोशीत  कठीण परिस्थितीत सामान्य जनता दिवस कंठत आहेत.

कांद्यासह भाज्या आदी दैनंदिन गरजेच्या जीवनावश्‍यक वस्तूंचे दर तर वाढतच आहेत. महागाईमुळे सध्या तर सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. बाजारात गेल्यावर जीवनावश्‍यक वस्तूंचे दर ऐकून गृहिणींचे डोळे तर पाणावत आहेत. मनासारख्या वस्तू खरेदी करता येत नाही. सामान्य जनता महागाईच्या कात्रीत अडकली आहे. आधीच ‘कोविड’मुळे अनेक कुटुंबांसमोर मोठी आर्थिक समस्या उभी राहिली आहे.

काटकसर करुन संसार चालवावा लागत आहे. त्यातच आता महागाईचे भूत मानगुटीवर बसल्याने गरीब जनता विवंचनेत अडकली आहे. ‘कितली म्हारगाय गे सायबिणी, संसार कसो करचो आमी’ असा उपहासात्मक प्रतिक्रियाही सध्या डिचोली परिसरात गृहिणींच्या तोंडून बाहेर पडत आहेत. सरकारने वेळीच महागाई नियंत्रणात आणली नाही, तर ‘कोविड’ सोडाच त्याहून महागाईचा भस्मासूर सामान्य जनतेला नेस्तनाबूत करेल. असा सूरही सामान्य जनतेकडून व्यक्‍त होत आहे.

संबंधित बातम्या