फोंड्यात लोकांना बसतात महागाईचे चटके!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

कोरोनाची महामारी...टाळेबंदीमुळे झालेली गोची... अन्‌ हिरावलेली रोजीरोटी अशा द्विधा मनस्थितीत सर्वसामान्य नागरिक असताना आता महागाईचे चटके बसू लागल्याने जगायचे कसे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. खायचे वांदे, त्यात वाढलेले कांद्याचे आणि भाजीपाला तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे दर यामुळे कुटुंब चालवणे मुश्‍किलीचे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया फोंडा तालुक्‍यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.    

फोंडा : कोरोनाची महामारी...टाळेबंदीमुळे झालेली गोची... अन्‌ हिरावलेली रोजीरोटी अशा द्विधा मनस्थितीत सर्वसामान्य नागरिक असताना आता महागाईचे चटके बसू लागल्याने जगायचे कसे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. खायचे वांदे, त्यात वाढलेले कांद्याचे आणि भाजीपाला तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे दर यामुळे कुटुंब चालवणे मुश्‍किलीचे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया फोंडा तालुक्‍यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.    

 कोरोनाच्या महामारीत मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या लोकांकडून आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकाला मरणासन्न करून सोडण्याचा प्रकार घडत असताना सरकार मात्र काहीच करू शकत नसल्याची खंत गरीब गरजू नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

रोजच्या जेवणातील कांदा आता शंभरीकडे झेप घेत आहे. बटाटा, टोमेटॉ तसेच इतर भाजीपाल्याचे दरही गगनाला गवसणी घालण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या फलोत्पादन महामंडळांमुळे काही अंशी भाजीपाल्याच्या दरांवर नियंत्रण ठेवले जात असले तरी मूळात बेळगाव व इतर भागातील परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दरच चढे असल्याने या चढ्या दराने गोमंतकीयांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. फलोत्पादन महामंडळाचे गाडे नसते तर खाजगी भाजीपाला विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला खरेदी करणे भाग पडले असते, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

फोंडा तालुक्‍यात जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढले आहेत. भाजीपाला, कडधान्ये आणि माशांचे दरही चढेच आहेत. त्यामुळे खायचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फोंडा तालुक्‍यातील काही स्थानिक विक्रेत्यांकडून गावठी भाजीची विक्री केली जात आहे, मात्र या भाजीचे दरही आता वाढलेले आहेत. सद्यस्थितीत तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश कामगारवर्गाचे पगार कापलेले आहेत, काही कंपन्या व प्रकल्पांनी तर थेट कामगारांच्या हातावर नारळ ठेवून कामावरून कमी केले आहे. फोंडा तालुक्‍याच्या जवळच्या खाण भागातही तीच स्थिती आहे. खाणी बंद असल्याने लोकांची रोजीरोटी चालत नाही, त्यामुळे जगण्यासाठी पैसा आणायचा कुठून असा सवाल केला जात आहे. 

गेल्या वर्षीही कांदा पोचला 
होता १५० रुपये किलो!

गेल्या वर्षीही कांदा महाग झाला होता. त्यावेळी २० ते ३० रुपये किलो मिळणारा कांदा चक्क १५० रुपये किलोवर पोचला होता. कांदा हा रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक असल्याने कांद्याशिवाय जेवण होत नाही, त्यामुळे महाग झाला तरी कांदा खरेदी करावाच लागतो. दरवर्षी कांदा महाग करून हे लोक बक्कळ पैसा कमावतात, पण गरिबांचे या लोकांना पडलेले नाही. पाऊस जादा झाला. 

अव्वाच्या सव्वा दर वाढवण्यासाठी 
संधीची वाट पाहणारे लोक...
दोन दिवस थोडी विश्रांती घेतली असली तरी मागच्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे भाजीपाला कुजला असल्याचे कारण दिले जात आहे. कांदा, बटाटा, टोमेटॉ तसेच इतर भाजीपाला कुजला असल्याने हे दर वाढल्याचे सांगितले जात आहे, मात्र दर वाढवण्यासाठी काही लोक संधीची वाट पाहत आहेत काय, असा सवालही केला जात आहे. काही ठिकाणी तर मुद्दामहून कृत्रिम टंचाई केली जात असून दर वाढल्यानंतर बक्कळ कमावण्याचे ध्येय या लोकांकडून ठेवले जाते.

रोजगार नसल्याने खिशात
पैसाच नाही, त्यामुळे खायचे काय?
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणाचेच वांदे झाले आहेत. खिशात पैसा नाही, सरकारी योजनांचा पैसाही दिलेला नाही, त्यामुळे खिशात पैसा नाही, आणि खायचे काय, असा सवाल गरीब गरजू नागरिकांकडून केला जात आहे. धनाढ्यांना अधिक श्रीमंत करून गरिबांना देशोधडीला लावण्याचा प्रकार देशात चालला असून सरकारनेच यावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

 

 

संबंधित बातम्या