गोव्यातील तरुण व महिला वर्गाच्या पुढाकाराने सर्वसामान्य जनतेचे जीवन पूर्ववत

गोव्यातील तरुण व महिला वर्गाच्या पुढाकाराने सर्वसामान्य जनतेचे जीवन पूर्ववत
goa

म्हापसा: राज्य शासनाची आपत्कालीन व्यवस्था (Emergency arrangement) यंत्रणा असून नसल्यासारखी झाली आहे. अशा परिस्थितीत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या राज्यातील युवा, तरुण नागरिक व महिला वर्गाच्या पुढाकाराने सर्वसामान्य जनतेला थोडाफार दिलासा मिळाला. तौक्ते वादळामुळे झाडांची पडझड झाल्याने वीजवाहिन्या, वीजखांब तुटलेल्या अवस्थेत होते. त्या कामांबाबत नागरिकांनी सहकार्य केल्यामुळेच रस्ते मोकळे झाले व बार्देशमधील सुमारे नव्वद टक्के वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला. दरम्यान बार्देश तालुक्याला रविवारपर्यंत अंधारमुक्त करण्याचा संकल्प वीज खात्याच्या अभियंत्यांनी केला आहे. (With the initiative of the youth and women in Goa, the lives of the common people have been restored)

आपण या अत्याधुनिक युगात असूनसुद्धा अग्निशमन दलाला आवश्यक यंत्रणा देण्यास राज्य सरकारला अपयश आले आहे. अग्निशमन दलासाठी काही भागांत सुसज्य अशा इमारतींचे बांधकाम करून ठेवले असले तरी झाडांची पडझड झाल्यानंतर ती झाडे कापण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. जनरेटरची व्यवस्थाही नाही. लिफ्ट असलेली ट्रॉलीही त्यांच्याकडे नाही. साधनसुविधांच्‍या अभावी अग्निशमन दलाचे जवान कार्य करीत आहेत. वीज खात्याची परिस्थितीही काही वेगळी नाही. राजकारण्यांच्‍या आशीर्वादाने नोकरभरती करत असताना मतपेढी पाहिली जाते आणि अकुशल व्यक्तींची नोकरभरती केली जाते. त्यामुळेच वीज खात्याकडे कुशल मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात नाही. खांब तुटून पडल्यानंतर ते पुन्हा उभारण्यासाठी वीज खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा नाही. बार्देशच्या बहुतांश भागांत या वादळामुळे तुटून पडलेले वीजखांबसुद्धा मनुष्यबळाचा वापर करूनच उभारले जात आहेत.

वीज खात्याचे काही अभियंते निवृत्तीच्‍या वळणावर पोहोचले आहेत. काही कनिष्ठ अभियंते काम करण्याची क्षमता चांगल्यापैकी असूनसुद्धा अंतर्गत धुसफुशीमुळे स्वत:च्या कौशल्याचा वापर करीत नाहीत. काही अभियंत्यांकडे नियोजन करण्याची क्षमताही नाही. लाइनमन तसेच अन्य कामगारांकडे वीज खांबांवर चढून वीजवाहिन्‍या ओढण्याचे कौशल्य नसल्यामुळे अन्य राज्यांतील कुशल मनुष्यबळाचा वापर करावा लागतो. अशा प्रकारे कठीण प्रसंगांतून वीज खाते वाटचाल करीत आहे. चक्रीवादळाच्‍या पार्श्वभूमीवर मात्र वीज खात्याच्‍या बहुतांश ज्येष्ठ ते कनिष्ठ अभियंत्यांनी मागच्या सहा दिवसांत प्रतिदिन सुमारे वीस तास काम केले आहे. वीज खात्याच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी सकाळी 8  ते रात्री 3 वाजपर्यंत काम करून जनतेच्‍या व कंत्राटदारांच्या कुशल मनुष्यबळाच्‍या साहाय्याने बार्देश तालुक्याला अंधारातून बाहेर काढण्यास अथक परिश्रम घेतले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com