आयुषच्या कंत्राटी डॉक्टरांवर तुटपुंजा वेतनामुळे अन्याय

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

आयुष डॉक्टरांना अल्पशा वेतनावर ‘कोविड - १९’ सेवेसाठी गोव्यातील वेगवेगळ्या क्वारंटाईन केंद्रे, स्टेडियम्स, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी जीवावर उदार होऊन महिना अवघ्या २० हजार रुपये वेतनावर काम करावे लागते.

पणजी: गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने २३ जुलै रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार शासनाच्या आखत्यारीत येणाऱ्या सर्व डॉक्टर, दंतचिकित्सक, आयुष डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल स्टाफ आदींना ‘कोविड - १९’ची सेवा अनिवार्य केली आहे, परंतु आयुषच्या कंत्राट पद्धतीवरील डॉक्टरांवर मात्र अन्याय होत असून त्यांना तुटपुंज्या वेतनावर सेवा बजावावी लागत आहे.

वरील परिपत्रकानुसार वेगवेगळ्या सरकारी प्राथमिक आरेाग्य केंद्रांमध्ये तसेच इस्पितळांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ८२ कंत्राटी आयुष डॉक्टरांना ‘कोविड - १९’च्या कामाला लावले आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरांना महिना फक्त २० हजार रुपये एवढे तुटपुंजे वेतन देऊन गेली सुमार पाच-सहा वर्षे अन्याय केला जात आहे. आयुष डॉक्टरांना अल्पशा वेतनावर ‘कोविड - १९’ सेवेसाठी गोव्यातील वेगवेगळ्या क्वारंटाईन केंद्रे, स्टेडियम्स, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी जीवावर उदार होऊन महिना अवघ्या २० हजार रुपये वेतनावर काम करावे लागते. ‘कोविड - १९’साठी काम करताना जीवावर बेतले, तर या डॉक्टरांना विम्याची कोणतीही रक्कम मिळणार नाही.  हल्लीच गोवा सरकारने ‘कोविड - १९’ची सेवा बजावण्यासाठी सहा महिन्यांसाठी नियुक्त केलेल्या आयुष डॉक्टरांसाठी व परिचारिकांसाठी महिना ३० हजार रुपये वेतन दिले जाते, तर वर नमूद केलेले आयुष डॉक्टर महिना फक्त २० हजार रुपयांवर काम करतात. 

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर वेतन वाढ करावी, अशी मागणी संबंधित डॉक्टर करीत आहेत.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या