कोलवाळ कारागृहात कैदी, तुरुंगरक्षकांत हाणामारीचे प्रकार सुरूच

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

तुरुंगरक्षकाच्या तक्रारी नोंद केल्या जातात मात्र कैद्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने हा वाद विकोपाला पोहचला आहे. या संदर्भात कारागृह अधिकाऱ्यांकडूनही गंभीर दखल घेतली जात नसल्याने कैद्यांमध्ये नाराजी आहे.

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैदी व तुरुंगरक्षक यांच्यात हाणामारीचे प्रकार सुरूच आहेत. मागील काही महिन्यांपासून या कारागृहात तुरुंगरक्षक व कैदी यांच्यात वादाचे रुपांत मारहाणीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. 

तुरुंगरक्षकाच्या तक्रारी नोंद केल्या जातात मात्र कैद्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने हा वाद विकोपाला पोहचला आहे. या संदर्भात कारागृह अधिकाऱ्यांकडूनही गंभीर दखल घेतली जात नसल्याने कैद्यांमध्ये नाराजी आहे.

कारागृहातील तुरुंगरक्षक नारायण नाईक हा ड्युटी बजावत असताना कैदी कृष्णा नाईक याने मागील प्रकरण उकरून काढून त्याच्याशी हुज्जत घालण्यात सुरुवात केली. यावेळी त्यांच्यामध्ये मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेची तक्रार नारायण नाईक तसेच कृष्णा नाईक यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. मात्र नारायण नाईक याचीच तक्रार अधिकाऱ्यांनी घेतली तर कृष्णा नाईक याची तक्रार घेतली नाही. यापूर्वी असे प्रकार घडले असून कैद्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. तेथील अधिकाऱ्यांकडून कैद्यांवर अन्याय केला जात असल्याचे सूत्राने सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, कैदी कृष्णा नाईक व तुरुंगरक्षक नारायण नाईक यांच्यात मंगळवारी खटके उडाले होते व त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली होती. हे प्रकरण त्या दिवशी तेवढ्यावरच संपले होते. काल बुधवारी पुन्हा कैदी कृष्णा नाईक याने तुरुंगरक्षक नारायण नाईक याला शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. यावेळी त्यांच्यात पुन्हा बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

या मारहाणीत दोघांनाही जखमा झाल्या. नारायण नाईक याने लेखी तक्रार कारागृहाच्या जेलरकडे दिली असता ती म्हापसा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली. त्यापाठोपाठ कृष्णा नाईक यानेही तक्रार दिली मात्र ती पोलिसांकडे पाठवण्यात आली नसल्याचे सूत्राने माहिती दिली. कारागृहात कैद्यांवर अशाप्रकारे अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायामुळे हे प्रकार घडत आहेत. 

कारागृहातील अधिकाऱ्यांनी कैद्यांमध्येच गट तयार केले आहेत. काही कैद्यांना चांगली वागणूक दिली जाते तर काहींना कैद्यांविरुद्ध या कैद्यांचा धमकावण्यासाठी वापर केला जातो. तुरुंगरक्षकही या कैद्यांना नाहक दमदाटी करत असल्याने तसेच खोट्या तक्रारी दाखल करत असल्याने काही कैद्यांना काही तुरुंग कर्मचाऱ्यांचा राग आहे. कारागृहातील या घडणाऱ्या प्रकरणाची दखल कारागृहाच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू झाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या