पॅरोलवरील ४४ कैद्यांची कारागृहात रवानगी

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

संसर्ग कमी झाला असल्याने गेल्या २० ऑक्टोबरला कारागृहाबाहेर असलेल्या कैद्यांना कारागृहात दाखल व्हावे, असे बिनतारी संदेश त्यांच्या राहत्या पत्त्यावर पाठवण्यात आले होते. 

पणजी : राज्यात कोविड महामारीचा संसर्ग वाढून तो कारागृहामध्ये पोहचल्यानंतर शिक्षा भोगत असलेल्या ५६ कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र हे प्रमाण नियंत्रणात आल्याने गेल्या सहा महिन्यापासून कारागृहाबाहेर आपापल्या घरी होते त्याना बिनतारी संदेश पाठवून कारागृहात परतण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत ४४ जण टप्प्याटपप्याने परतले आहेत अशी माहिती कारागृह महानिरीक्षक गुरुदास पिळर्णकर यांनी दिली. 

कोरोना संसर्गाचे प्रमाण देशात वाढू लागल्याने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल देऊन सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचा आधार घेत कोलवाळ येथील कारागृहात दरदिवशी कोविड संसर्गाचे प्रमाण वाढल्याने कैद्यांनी त्यांची पॅरोलवर सुटका करण्याची मागणी केली होती. हा संसर्ग कारागृहात वाढू नये म्हणून कारागृह प्रशासनाने सरकारला माहिती देऊन निर्णय घेतला होता. आता हा संसर्ग कमी झाला असल्याने गेल्या २० ऑक्टोबरला कारागृहाबाहेर असलेल्या कैद्यांना कारागृहात दाखल व्हावे, असे बिनतारी संदेश त्यांच्या राहत्या पत्त्यावर पाठवण्यात आले होते. 

त्यानंतर काहीजण कारागृहात परतले तर दहा कैद्यांनी सर्वोच्च न्यायालयाने कोविडचा संसर्ग असेपर्यंत कैद्यांना पॅरोलवर ठेवण्यास मुभा दिली आहे त्याचा संदर्भ घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. 

दरम्यान, सध्या कोलवाळ कारागृहात कोविड संसर्ग झालेला एकही कैदी किंवा तुरुंगरक्षक नाही. एखाद्याला जरी कोविडची लक्षणे दिसू लागल्यास त्याची इस्पितळात तपासणीसाठी पाठविण्यात येते. कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. जे कैदी गेले काही महिने कारागृहाबाहेर होते त्याना कारागृहात घेतल्यावर संशय नको म्हणून कोविड चाचणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅरोलवर असलेले दोन कैदी अजूनही कारागृहात परतले नाही त्यापैकी एकाला उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच सुटका केली आहे. त्यामुळे तो येण्यास तयार नाही. ज्यावेळी त्याला पॅरोलवर सोडण्यात आले तेव्हा त्याला सुटका करण्याचा आदेश झाला नव्हता. 

त्यामुळे कारागृह नियमानुसार त्याला कारागृहात परतावे व त्यानंतर सविस्तर प्रक्रिया पूर्ण करून त्याची सुटका केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. एका कैद्याने दिलेल्या पत्त्यावर तो सापडू शकला नाही मात्र केलेल्या चौकशीत तो बंगळुरू येथे असल्याचे उघड झाले. त्याला बिनतारी संदेश पाठवून कारागृहात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या