कोरोना मृतांच्या आकड्यात घोळ; गोव्यातील खासगी रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

या कारवाईतून कोणत्याही रुग्णालयाला सूट दिली जाणार नाही, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी: कोविडमुळे मरण पावलेल्या रुग्णांची माहिती खासगी रुग्णालयांनी दडवल्याचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला आहे. खासगी इस्पितळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांची उत्तरे आली की सरकार कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करील. या कारवाईतून कोणत्याही रुग्णालयाला सूट दिली जाणार नाही, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.(An inquiry has been ordered into private hospitals in Goa)

ते म्हणाले की, कोविडमुळे किती मृत्यू झाले याची नेमकी आकडेवारी मिळाली की सरकारची कार्यवाहीची दिशा त्यानुसार ठरते. आता नेमलेल्या कृती समितीने माहितीचे विश्लेषण करून कोविड उपचाराची पद्धत बदलली आहे. वापरावयाची औषधे बदलली आहेत. तो तज्ज्ञांचा विषय असल्याने प्रशासनाचा तेवढा संबंध त्याच्याशी येत  नाही. असे निर्णय घेताना अचूक आकडेवारी लागते त्यासाठी या इस्पितळांकडून माहिती दडवण्यातून सरकारी निर्णयावर प्रतिकूल प्रभाव टाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कारणे दाखवा नोटिशींनंतर कारवाई करण्याची सरकारची तयारी आहे.

IVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल

दरम्यान, निवडणुकीच्या वर्षात या विषयावरून जनतेत संभ्रम आणि सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी या मुद्द्याचा वापर होण्याची शक्यता गृहित धरून सरकारने आता खासगी इस्पितळांविरोधात कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे.

गृह अलगीकरणासाठी खास कॉल सेंटर्स

मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्यांदा कॉल सेंटर्स सुरू  केले आहे. येथे काम करणारे कर्मचारी रुग्णाला स्वतः दूरध्वनी करून संपर्क साधतात. पुढील १० दिवस आयव्हीआरएस या स्वयंचलित यंत्रणेकडून संपर्क साधला जातो व माहिती संकलीत केली जाते. एखाद्या रुग्णाने माहिती देणे थांबवल्यास तेथे कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्याकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास त्या भागातील सरकारी यंत्रणा त्या पत्त्यावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेते. त्यामुळे गृह अलगीकरणातील कोविड रुग्णाविषयी माहिती दडवली जाऊ शकत नाही.

संबंधित बातम्या