पेडण्यातील तपासणी नाके असुरक्षित

dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी - बांदा सीमेवरील तपासणी नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर तेथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत असल्याने सीमेलगतच्या गावांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची व्यवस्थित तपासणी केली जात नसल्याचे आता हळू हळू स्पष्ट होऊ लागले आहे.

मोरजी

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी - बांदा सीमेवरील तपासणी नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर तेथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत असल्याने सीमेलगतच्या गावांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची व्यवस्थित तपासणी केली जात नसल्याचे आता हळू हळू स्पष्ट होऊ लागले आहे. काही वाहनांना तर पोलिस न तपासताच राज्यात प्रवेश देतात. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या वाहनांची सविस्तर माहिती योग्य ती तपासणी करण्यासाठी नाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभाव आहे आणि पत्रादेवी तपासणी नाक्यावर नको रे बाबा ड्युटी अशी विनवणी कर्मचारी आपल्या वरिष्ठांकडे करताना दिसत आहेत.
१२ रोजी मुंबई येथून एका वाहनातून आलेल्या सहाही नागरिकांचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने आता या नाक्यावर काम करण्यासाठी कर्मचारी घाबरत आहेत. १२ रोजी जे कर्मचारी कामावर तिथे होते, त्यांना ‘होम क्वारंटाईन’ व्हावे लागले होते. एकूण १५ कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले तरीही कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे . या नाक्यावर पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. केवळ तेथे येणाऱ्या नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासून राज्यात प्रवेश दिला जातो.

न्हयबाग – सातार्डा तपासणी
नाक्यावर देवाण घेवाण

पेडणे तालुक्यात पत्रादेवी – बांदा , किरणपाणी – आरोंदा व न्हयबाग - सातार्डा हे महत्वाचे तीन तपासणी नाके आहेत. त्यापैकी केवळ सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग ६४ वरील पत्रादेवी – बांदा हा तपासणी नाका कडक पोलिस बंदोबस्तात खुला आहे, तर न्हायबाग- सातार्डा आणि किरणपाणी, तसेच अंतर्गत रस्त्यावरील पत्रादेवी - बांदा हे तपासणी नाके पूर्णपणे बंद आहेत. त्या ठिकाणी दोन्ही बाजूने राज्याचा व महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त आहे. या नाक्यावरून कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र, घरगुती जीवनावश्यक वस्तूंची देवाण घेवाण चालू आहे. न्हयबाग पुलावर सातार्डा, कवथणी भागातील मिरच्या, नारळ, आंबे, फणस, झाडू या वस्तू या पुलावर आणून देतात व तेथून ते पुलावरून घेऊन जातात. मात्र कोणालाही सातार्डा पूल ओलांडायला मिळत नाही. महाराष्ट्रातील व्यापारी या पुलावर सामान आणून देतात. त्याच पद्धतीने बांदा भागातील व्यापारी पत्रादेवीचीस खालच्या नाक्यावर नागरिकांना आवश्यक ते समान आणून देवाण घेवाण करतात. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांची सोय होते.

दारूची तस्करी
पत्रादेवी येथून चोरवाटेने मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. या व्यवहारात सीमा भागातील एका माजी सरपंचाचा हात असल्याचे खात्रीलायक सूत्राकडून समजते. लॉकडाऊन काळात या माजी सरपंचाने मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केलेली आहे याकडे अबकारी खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.

रेल्वे पुलावरून प्रवेश
तेरेखोल नदीवर उगवे - सातोसे असा रेल्वे पूल आहे. या रेल्वे पुलावरून पहाटे सातार्डा, सातोसे, कवठणी या भागातून कामगार, व्यापारी राज्यात प्रवेश करतात. या पुलावर कोणत्याच प्रकारची तपासणी केली जात नाही किंवा पोलिस बंदोबस्तही नाही.

होडीद्वारेही राज्यात प्रवेश
सातोसे ते उगवे, कासात ते तोरसे आणि कवठणी ते देवसू या जलमार्गातून होद्यातून महाराष्ट्र येथून नागरिक राज्यात प्रवेश करत असल्याने खळबळ माजलेली आहे. तसेच केरी - तेरेखोल भागात तेरेखोल नदीवर फेरीसेवा चालू आहे. रेडी - शिरोडा भागातील काही व्यापारी, नागरिक चोर वाटेने फेरीबोटीत येतात, आपल्या समानाची विक्री करतात व जाताना दारू घेवून जातात. तेरेखोल व रेडी सीमा जवळच असल्याने चोरवाटेने तेथील नागरिक दारूसाठी तेरेखोल गावात प्रवेश करत आहेत.

गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा

संबंधित बातम्या