आपल्याच पक्षाच्या सरकारला दिला घरचा आहेर...

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

पणजीचे भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. कसिनोंना कोट्यवधी रुपयांचे शुल्क माफ केल्याच्या एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला घेत आपल्याच सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे.

पणजी: पणजीचे भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. कसिनोंना कोट्यवधी रुपयांचे शुल्क माफ केल्याच्या एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला घेत आपल्याच सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे. त्यामुळे आमदार कुंकळ्येकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

पणजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बाबूश मोन्सेरात भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक भाजपमध्ये दोन प्रवाह दिसून आले आहेत. त्यामुळे आमदार कुंकळ्येकर अधूनमधून आमदार मोन्सेरात यांच्यावर टीका न करता त्यांचे सत्तास्थान असलेल्या महापालिकेवर टीका करतात, हे जगजाहीर आहे. राज्यातील कसिनो सुरू झाल्यानंतर पर्यटन सुरू होण्यास मदत होईल म्हणून राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून कसिनो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु या परवानगी देण्याबरोबरच त्या कसिनोंना कोट्यवधी रुपयांचे शुल्क माफ केल्याचे वृत्त एका स्थानिक इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला घेत कुंकळ्येकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी सरकारवर टीका करीत आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

कुंकळेयकर हे पक्षाचे आयटी सेलचे प्रमुख आहेत. शंभर दिवसांत कसिनो काढून टाकण्याऐवजी त्यांची देय असलेली मोठी रक्कम काढून टाकलेली आहे. “Instead of removing #Casinos in 100 days, @Govtof Goa removes huge money payable by them to #Goan #Treasury,” अशाप्रकारे हॅशटॅग वापरत आपले मत व्यक्त केले आहे. असे ट्विट येताच त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खुलासा केला आहे. कसिनोंना शुल्क माफ केले जाणार नसून, त्यांचाकडून तो वसूल केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या