अव्वल कारकून निवड रद्द केलेल्या आदेशाला अंतरिम स्थगितीस नकार 

dainik gomantak
शनिवार, 27 जून 2020

याचिकादाराची निवड करून त्याला अव्वल कारकून पदासाठीचे स्वीकृती पत्र देण्यात आले होते व त्याच्या पदवी प्रमाणपत्रसंदर्भात आलेल्या तक्रारीची चौकशी करून ते मागे घेण्यात आले आहे.

पणजी

उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पदासाठीची निवड रद्द केल्याप्रकरणी उपसभापतींचे पुत्र रेमंड फर्नांडिस यांनी सादर केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज अंतरिम स्थगितीस देण्यास नकार देत ही याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकादार व प्रतिवादींनी उत्तर - प्रत्युत्तर चार महिन्यांत पूर्ण करून याचिकादारांनी लवकर सुनावणीसाठी खंडपीठाने मुभा ठेवली आहे. 
याचिकादार रेमंड फर्नांडिस याने सादर केलेली पदवी प्रमाणपत्र मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे असल्याने ही पदवी ग्राह्य धरता येत नसल्याचे कारण देऊन त्यांची निवड रद्द ठरविली आहे. त्यांनी दिलेल्या या आदेशात प्राथमिक सुनावणीवेळी हस्तक्षेप करून अंतरिम स्थगिती देणे योग्य होणार नाही. याचिकादाराची निवड करून त्याला अव्वल कारकून पदासाठीचे स्वीकृती पत्र देण्यात आले होते व त्याच्या पदवी प्रमाणपत्रसंदर्भात आलेल्या तक्रारीची चौकशी करून ते मागे घेण्यात आले आहे. त्याला देण्यात आलेले पत्र मागे घेण्यापूर्वी कारणेदाखवा नोटीस बजावून बाजू मांडण्यास संधी देण्यात आली होती. त्यामुळे त्याला अंतरिम स्थगिती न देण्याबाबत या खंडपीठाचे समाधान होत आहे. प्रतिवाद्यांना नोटीस देण्यात येऊन ही सुनावणी चार महिन्यानंतर ठेवण्यात येत असल्याचे दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
याचिकादारातर्फे ॲड. तेरेन्झ वाझ यांनी बाजू मांडताना सांगितले की, याचिकादारने जी पदवी अव्वल कारकून पदासाठी सादर केली होती त्या विद्यापीठाची मान्यता काढण्यात आली आहे. १६ पदांपैकी १५ जणांना सेवेत घेण्यात आले आहे. या रिक्त झालेल्या पदासाठी जाहिरात काढून ते भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचिकादारची निवड रद्द केलेल्या आदेशाला अंतरिम स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आली. सरकारतर्फे ॲड. अंकिता कामत यांनी नोटीस स्वीकारली. याचिकादाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणेदाखवा नोटिशीला उत्तर देताना एखाद्याची निवड झाल्यानंतर ती रद्द करण्याचा अधिकार नाही असे म्हटले होते. 
दरम्यान, याचिकादारच्या बनावट पदवी प्रमाणपत्रसंदर्भात तक्रार दाखल करणारे ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी उपसभापतीचे पुत्र रेमंड फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यपालांना निवेदन दिले आहे.  

 
 

संबंधित बातम्या