गोवा: काँग्रेसमधील खदखद उफाळली! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

मडगाव पालिकेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड व आमदार विजय सरदेसाई यांच्या युतीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

पणजी: मडगाव पालिकेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड व आमदार विजय सरदेसाई यांच्या युतीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. याची परिणती म्हणून पालिका निवडणुकीनंतर गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरून गिरीश चोडणकर यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ( Internal disputes in the Goa Congress are coming out )                                               

अशी पडली वादाची ठिणगी?                                                          
डिमेलो हे साळगावमधून मडगावमध्ये चोडणकर यांच्या परवानगीशिवाय गेले नव्हते. त्यामुळे या साऱ्यामागे चोडणकर यांचा हात असल्याचे सिद्ध झाले आणि तेथूनच आजवर शीतपेटीत असलेला वाद उफाळून आला. हे प्रकरण तातडीने प्रभारी दिनेश राव यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यांनी डिमेलो हे निमंत्रक असलेली पक्षाची माध्यम संवाद समितीच बरखास्त करून टाकली. माजी केंद्रीयमंत्री ॲड. रमाकांत खलप या समितीचे अध्यक्ष होते. याशिवाय सध्‍या सक्रिय नसलेले सुनील कवठणकर मुख्य प्रवक्ते, स्व. जितेंद्र देशप्रभू प्रवक्ते, सिद्धनाथ बुयाव, भाजपवासी (BJP) झालेले उर्फान मुल्ला या समितीत प्रवक्ते पदावर होते. आता ही समिती बरखास्त केल्याने नव्याने समिती नेमली जाईल. 
काँग्रेसची (Congress) डिजीटल सदस्यत्व मोहीम भरकटल्याचे वृत्त आज ‘गोमन्तक’ (Gomantak)मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या समितीचे सहअध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी या पदाचा राजीनामा दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मडगाव पालिकेच्या या युतीला फातोर्डा गट काँग्रेस समितीचा पाठींबा नाही. त्यांनी तसे पत्रकार परिषदेत जाहीर केले. चोडणकर यांनीही मडगावमधील प्रचारात सक्रियपणे भाग घेतला नाही. प्रचार करणार की नाही, हे सांगण्यासही त्यांनी नकार दिला. त्याचदरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी मडगावात जाऊन विरोधी पक्षनेते व आमदार रेजिनाल्ड यांच्यावर आरोप केले होते.

सावधान! गोव्यात कोरोना पुन्हा फोफावतोय; राज्यातील परिस्थितीचा स्पेशल रिपोर्ट

बरखास्तीचे पहिले पाऊल!‍
चोडणकर यांनी दोनवेळा राजीनामा देऊनही त्या पदाची जबाबदारी दुसऱ्या कोणत्या नेत्याकडे न सोपवल्याने त्यांना पर्याय नाही, असे चित्र निर्माण झाले होते. नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देणार, असे सांगून युवा नेत्यांच्या मनात राजकीय भवितव्याविषयी त्यांनी आशा जिवंत ठेवली आहे. त्यामुळे युवा नेत्यांचे त्‍यांना समर्थन आहे. चोडणकर यांच्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी याआधीही अनेकदा टीका केली आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाव्य राजकारणाला चोडणकर यांचा अडसर नको, असे काहींना वाटू लागले आहे. 
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी नाराज होऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्‍यासाठी नव्या प्रादेशिक पक्षाच्या स्थापनेची सारी व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या