वीज खात्याच्या नियोजनशून्य कामाचा इंटरनेट ग्राहकांना फटका

तीव्र संताप : पणजी, पर्वरी परिसरात ठिकठिकाणी केबल्स तोडले; उपाययोजनेची मागणी
Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak

पणजी : वीज खात्याच्या नियोजनशून्य पद्धतीमुळे पणजी, पर्वरी व मडगावच्या काही परिसरातील इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. त्याचा फटका विविध घटकांतील लोकांना बसला आहे. सध्या रस्त्याच्या बाजूने असलेले विजेचे खांब बदलण्याचे काम सुरू आहे, मात्र हे काम करताना कंत्राटदारांनी सावधगिरी न बाळगल्याने ठिकठिकाणी केबल्स तोडण्यात आल्‍या आहेत. त्याचा भुर्दंड लोकांना सहन करावा लागला आहे.

गोव्यात किमान पाच इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्या असून विजेच्या खांबावर वायर टाकून ते खात्याला दर खांबामागे रुपये 50 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारात असतात. परंतु, नवीन खांब टाकताना कर्मचारी इंटरनेट कंपनीशी संपर्क करीत नसतात. काही ठिकाणी तर वीज खात्याने कंत्राटदार नेमले असून ते नवीन खांब बसविताना इंटरनेटचे केबल तोडून टाकतात. ‘पणजी व आसपासच्या भागात इंटरनेट सेवा खंडित झाली, त्याला फायबर तोडून टाकणे कारण झाले’ अशी माहिती आयटी क्षेत्रातील एका व्यावसायिकाने दिली.

अनेक लोक इंटरनेटच्या साहाय्याने आपली दैनंदिन कामे करत असतात. मात्र वीज खात्याच्या या बेभरवंशाच्या काराभारामुळे अनेकांना फटका बसला आहे. अनेक इंटरनेट सेवा प्रदाते (आयएसपी) जे वीज खात्याची इंटरनेटसाठी बिले भरतात त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

वीज खात्याने केबल्स ठिकठिकाणी नादुरुस्त केल्याने इंटरनेट ग्राहकांकडून आयएसपी केंद्रांना सेवा पूर्ववत करण्यासाठी अनेक कॉल्स येत आहेत. ही सेवा कधी पूर्ववत करता येईल याबाबत कोणतीच हमी दिली जात नसल्याने इंटरनेट ग्राहक मात्र अडचणीत आले आहेत. वीजखांब बदलण्याचे काम आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याने ही समस्या आणखी किती दिवस राहणार आहे असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ही परिस्थिती सुटण्याऐवजी ती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरकार व माहिती तंत्रज्ञान खात्याने ही सेवा पूर्ववत करण्यासाठी वीज खात्याशी संपर्क साधून ती सोडवावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

कंत्राटदारांची मनमानी

वीज खांबाच्या कामावेळी केलेल्या खोदकामामुळे इंटरनेट सेवेचे केबल्स नादुरुस्त झाल्याने अनेक भागामध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शेकडो लोक घरातून काम करत असतात व त्यांचे काम वायफाय सेवांवर अवलंबून असते. वीज खात्याच्या कंत्राटदाराने मात्र इंटरनेट केबल्सला धक्का न लावता काम करण्याऐवजी मन मानेल त्या पद्धतीने काम करून अनेकांना अडचणीत आणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com