राज्यातील विविध विषयांत हस्तक्षेप करावा 

विलास महाडिक
बुधवार, 29 जुलै 2020

राज्यात या कोविड समस्येमुळे गोमंतकियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोविड - १९ प्रकरणी सरकारला अपयश आले आहे. मोले येथील भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यानातून प्रकल्प उभारले जात आहे त्यामुळे तेथील पर्यावरणाचा समतोल बिघडवला जाणार आहे.

पणजी

राज्यातील कोविड समस्या तसेच शिक्षण व रोजगार या गोमंतकियांच्या जवळीक असलेल्या विविध विषयांसंदर्भातचे निवेदन आज ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’तर्फे ॲड. ह्रदयनाथ शिरोडकर व महेश म्हांबरे यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन सादर केले. यावेळी त्यांनी या विषयांमध्ये हस्तक्षेप करून लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली. 
गोव्यासह संपूर्ण देश सध्या कोविड महामारीच्या संकटात असून त्याविरुद्ध लढा देत आहे. मात्र या समस्येबरोबरच राज्यातील मोले, म्हादई, शिक्षण, कामगार व रोजगार, पर्यटन, कोविड गैरव्यवस्थापन व कोविड योद्धे या सर्वांवर प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा लक्ष ठेवून आहे. राज्यात या कोविड समस्येमुळे गोमंतकियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोविड - १९ प्रकरणी सरकारला अपयश आले आहे. मोले येथील भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यानातून प्रकल्प उभारले जात आहे त्यामुळे तेथील पर्यावरणाचा समतोल बिघडवला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात तर सरकारने वारंवार वेळोवेळी निर्णय बदलून शिक्षक तसेच पालक यांना गोंधळात टाकले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू करून काही विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. राज्यात कनेक्टीव्हीटी नाही तसेच काहींकडे मोबाईलची सुविधाही नाही त्यामुळे त्यांना शिक्षण घेणे मुश्किलीचे बनले आहे हे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 
राज्याचा महसुलाचा कणा असलेला पर्यटन क्षेत्र पूर्ण कोलमडले आहे. पर्यटकांची चाचणी करून त्यांचा अहवाल येईपर्यंत क्वरांटाईन करून ठेवण्यात येते. या क्वारांटाईन काळातील वास्तव्याचा खर्च पर्यटकांना स्वतः करावा लागत असल्याने पर्यटकही फिरकेनासे झाले आहेत. काही मार्गदर्शक तत्त्वे लादून व कोविड महामारीचे प्रमाण कमी झाल्यावर हे पर्यटन क्षेत्र हळूहळू सुरू करून त्यानंतर समुद्रकिनारे खुले करायला हवेत. कोविड योद्धे यांना सरकारने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यावेळी राज्यपालांनी त्यांची बाजू ऐकून घेतली व त्यात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती म्हांबरे यांनी दिली. 

संबंधित बातम्या