किनारपट्टी भागात आयपीएल सट्टेबाजी तेजीत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

परदेशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांची स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचून रोमांचकारक स्थितीत पोहचली असल्याने काही परप्रांतीय गोव्याच्या किनारपट्टी भागात भाडेपट्टीवर फ्लॅट तसेच बंगले (व्हिला) घेऊन सट्टेबाजी स्वीकारत आहेत. या सट्टेबाजीवर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र, त्यातूनही अनेक परप्रांतीयांनी नकळत गोव्यातून कोट्यवधींच्या सट्टेबाजीचा बाजार मांडला आहे. 

पणजी :  परदेशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांची स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचून रोमांचकारक स्थितीत पोहचली असल्याने काही परप्रांतीय गोव्याच्या किनारपट्टी भागात भाडेपट्टीवर फ्लॅट तसेच बंगले (व्हिला) घेऊन सट्टेबाजी स्वीकारत आहेत. या सट्टेबाजीवर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र, त्यातूनही अनेक परप्रांतीयांनी नकळत गोव्यातून कोट्यवधींच्या सट्टेबाजीचा बाजार मांडला आहे. 

आतापर्यंत पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजांना गजाआड केले आहे. ते कळंगुट परिसरातील काही फ्लॅट व बंगल्यामधून व्यवहार चालवत होते. ताळगावात एका फ्लॅटमध्ये पणजी पोलिसांनी कारवाई केली होती. कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी तर चार ठिकाणी सट्टेबाजांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन गजाआड केले. सट्टेबाजी हा एकप्रकार जुगाराप्रमाणेच असल्याने हा जामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे या सट्टेबाजांना अटक केली तरी त्याना त्वरित जामीन द्यावा लागतो. त्यामुळे सट्टेबाजीस वापरण्यात आलेल्या उपकरणांमधून माहिती मिळवण्यासाठी व तपास करण्यासाठी पुरेसा वेळही नसतो. या सट्टेबाजांना अटक झाली तरी त्याना त्याची फिकीर नसते. गुन्हे नोंद होऊन, त्याचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात खटला सुरू होईपर्यंत त्याला कित्येक वर्षे जातात त्यामुळे सट्टेबाजी स्वीकारणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहत नाही.  

पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सट्टेबाज हे गुजरात, मध्य प्रदेश तसेच इतर राज्यातील आहेत. दरवर्षी हे सट्टेबाज देशातील अनेक भागामध्ये सट्टेबाजीचा व्यवहार करण्यासाठी जात असले तरी अनेकजण गोव्याला अधिक पसंती देतात. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे हे स्थळ सुरक्षित असल्याचे त्यांना वाटते. फ्लॅट किंवा बंगले भाडेपट्टीवर ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घेतले जातात
व स्पर्धा सुरू होण्याच्या आधी ते गोव्यात येऊन राहतात. या सट्टेबाजीसाठी लागणारी उपकरणे लॅपटॉप व मोबाईल ही वापरातीलच उपकरणे असल्याने त्याचा कोणालाही संशय येत नाही. हॉटेलमध्ये हा सट्टेबाजीचा व्यवहार केल्यास त्यावर छापे पडण्याची शक्यता अधिक असल्याने या सट्टेबाजांनी फ्लॅट व बंगले भाडेपट्टीवर घेऊन पोलिसांच्या नजरेतून लपूनछपून सट्टेबाजी किनारपट्टी भागात सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

राज्यात आता आजपासून मांडवीतील तरंगत्या कसिनो पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करणारे गोव्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही आयपीएल क्रिकेट सामने होणार आहेत व ही स्पर्धा शेवटच्या क्षणी रंगात आली असल्याने कोट्यवधीची उलाढाल या सट्टेबाजीवर अपेक्षित आहे. हा सर्व व्यवहार लॅपटॉप व मोबाईलवरून होतो त्यामुळे रोख रक्कम जप्त करण्याचा प्रश्‍नच येत नाही. या लॅपटॉपमध्ये सट्टेबाजीवर लावलेल्या रोख रक्कमेची माहिती असते तर रोख रक्कमेचा व्यवहार होत नाही. अशावेळी छापा टाकल्यावर पुरावे जमा करण्यासाठी सायबर कक्षाची मदत घ्यावी लागते अशी माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संबंधित बातम्या