वरिष्ठांच्या दडपणामुळे ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना लागले दिल्लीला जाण्याचे वेध

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पोलिस अधीक्षकांचे सर्व अधिकार स्वतःकडेच घेतल्याने काही आयपीएस अधिकाऱ्यांत नाराजी आहे. त्यातील काहींची गोव्यातील सेवा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने व वरिष्ठांच्या दडपणामुळे दिल्लीत बदल्यांसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

पणजी :पोलिस खात्याचा ताबा नवे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी घेतल्यापासून गेल्या काही महिन्यांपासून कामाचा धडाका लावला आहे. पोलिस अधीक्षकांचे सर्व अधिकार स्वतःकडेच घेतल्याने काही आयपीएस अधिकाऱ्यांत नाराजी आहे. त्यातील काहींची गोव्यातील सेवा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने व वरिष्ठांच्या दडपणामुळे दिल्लीत बदल्यांसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

गोवा पोलिस खात्यात सध्या थेट आयपीएस झालेले सहा अधिकारी आहेत तर बढती मिळालेले तीन आयपीएस अधिकारी आहेत. ५० वर्षेवरील आयपीएस अधिकाऱ्यांचा एखाद्या ठिकाणचा सेवा काळ दोन वर्षाचा तर ५० वर्षाखालील आयपीएस अधिकाऱ्यांना तीन वर्षे कार्यकाळ असतो. जसपाल सिंग यांची गोव्यातून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रिक्त असून कोणाचीच वर्णी लावलेली नाही. दोन उपमहानिरीक्षक, पाच अधीक्षक व एक सहाय्यक अधीक्षक पदाचे आयपीएस अधिकारी सध्या गोवा सेवेत कार्यरत आहेत. 

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिस उपमहानिरीक्षक राजेश कुमार यांचाही दोन वर्षाचा गोव्यातील कार्यकाळ संपला आहे. त्यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहे मात्र त्यांना त्यात यश मिळालेले नाही. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार यांनी पुढील काही महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे तेही बदलीची वाट पाहत आहेत. नव्या पोलिस महासंचालकांनी ताबा घेतल्यापासून पोलिस खात्यात वातावरण बिघडलेले आहे. पोलिस अधीक्षकांना स्वतः निर्णय घेण्यास असलेले काही अधिकारही राहिलेले नाहीत त्यामुळे बरीच नाराजी पोलिस अधिकाऱ्यांत आहे.  

काही दिवसांपूर्वी पोलिस महासंचालकांनी पर्वरी येथे भेट देऊन पोलिस खात्यासाठी नवी इमारत उभारण्यासाठी पाहणी केली होती. या पाहणीवेळी भर उन्हात त्यांनी चालत अधिकाऱ्यांना सोबतीला घेतले होते. त्यांच्या या कार्यपद्धतीबाबत अनेक अधिकारी नाराज आहेत.

संबंधित बातम्या