आयपीएससीडीएलतर्फे ‘इंडिया सायकल्स फोर चेंज चॅलेंज'चे आयोजन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार केंद्रीय मंत्रालयातर्फे ‘इंडिया सायकल्स फोर चेंज चॅलेंज'' हा उपक्रम ठरविला असून, १३ सप्टेंबर रोजी ९.६ किलोमीटर अंतर नागरिक सायकल चालवतील. 

पणजी: पणजीत पुढील महिन्यात सायकल चालविण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी या उपक्रमात पणजीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) कंपनीने केले आहे. आयपीएससीडीएलकडून त्यासाठी पणजीतील नागरिकांचे मते ऑनलाईन जाणूनही घेतली जात आहेत. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार केंद्रीय मंत्रालयातर्फे ‘इंडिया सायकल्स फोर चेंज चॅलेंज'' हा उपक्रम ठरविला असून, १३ सप्टेंबर रोजी ९.६ किलोमीटर अंतर नागरिक सायकल चालवतील. 

सध्या कोरोनामुळे लोक वैतागून गेले आहेत. अनेकजण घरात बसून-बसून कंटाळले आहेत. त्यातच काहीजण आरोग्याकडे आता लक्ष देऊ लागले आहेत. आरोग्याचे महत्त्व कळू लागल्यामुळे लोकांना अधिकाधिक सायकल चालविण्याकडे वळविण्याचा प्रयत्न आता होऊ लागला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्मार्ट सिटीच्या उपक्रमांतर्गत सायकल चालविण्याचे कार्यक्रम आयोजिले जात आहेत. पणजीत आयपीएससीडीएलने सायकलिंगविषयी नागरिकांची मते ऑनलाईन पद्धतीने जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.  येत्या १३ सप्टेंबर रोजी रायबंदर ते दोना पावला अशा ९.६ किलोमीटर अंतर सायकल चालविण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात पणजीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या सायकल चालविण्याच्या उपक्रमात आयपीएससीडीएल कंपनी सहभागी होणाऱ्यांना टी-शर्ट, ठिकठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून देणार आहे. त्याशिवाय रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत रायबंदर ते दोनापावला अशा मार्गावर डाव्याबाजूचा मार्ग पूर्णपणे सायकल चालविणाऱ्यांसाठी मोकळा ठेवला जाईल. 

दुसऱ्यांदा राबविला जातोय उपक्रम
सन २०१५ मध्ये पणजीचे तत्कालीन आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी महापौर तथा नगरसेवक शुभम चोडणकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांच्या उपस्थितीत हाच उपक्रम राबविण्यात आला होता. तेव्हा दिवजा सर्कल ते मिरामारमार्गे दोनापावला असा सायकल चालविण्याचा मार्ग निवडला गेला होता. आता फक्त त्यात रायबंदर ते दिवजा सर्कलपर्यंतचा मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या