जलसंसाधन खात्यातर्फे डिचोलीतील बंधारे खुले

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

वाठादेव, व्हावटी आदी भागातील बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटी काढून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून देण्यात आली आहे.

डिचोली

मॉन्सूनची चाहूल लागल्याने जलसंसाधन खात्यातर्फे डिचोलीतील विविध ठिकाणच्या नदीवरील बंधारे आता उघडे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दरवर्षी मॉन्सून जवळ आला, की या बंधाऱ्यांच्या प्लेटी काढून ते खुले करण्यात येतात. सध्या जलसंसाधन खात्याने हे काम हाती घेतले आहे, अशी माहिती खात्याचे सहायक अभियंता के.पी. नाईक यांनी दिली.
वाठादेव, व्हावटी आदी भागातील बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटी काढून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून देण्यात आली आहे. सध्या या प्लेटी हलवण्याचे काम सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर साधारण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लोखंडी प्लेटी बसवून बंधारे पुन्हा बंद करण्यात येणार आहेत. उन्हाळ्यात शेती, बागायती पिकांसाठी आवश्‍यक जलसाठा उपलब्ध व्हावा, त्याची उपाययोजना म्हणून जलसंसाधन खात्यातर्फे वाळवंटी नदीसह डिचोली नदीवरील वाठादेव, व्हावटी, कुडचिरे आदी भागात बंधारे बांधण्यात आले आहेत. पैकी साळ आणि वाळवंटी नदीवरील मिळून दोन बंधाऱ्यातील पाणी पंपिग करुन जनतेची तहान भागवण्यासाठी अनुक्रमे अस्नोडा आणि पडोसे जलशुध्दीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. आमठाणे धरणातील जलसाठा कमी होवू लागला, की साळ बंधाऱ्यातील पाणी या धरणातही सोडण्यात येते. पावसाळा संपला, की या बंधाऱ्यांवरीत लोखंडी प्लेटी बसवून पुन्हा पाणी अडवण्यात येते. दरम्यान, उन्हाळ्यात तर काही बंधारे स्थानिकांसह पर्यटकांना आकर्षिंत करतात. उकाडा असह्य झाला, की शीतल पाण्याचा गारवा हवाहवासा वाटतो. अशावेळी हे बंधारे सर्वांना खुणावू लागतात.साळ येथील बंधारा तर उन्हाळी पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. यंदा ‘कोविड’ महामारीमुळे बंधारे ओस पडले आहेत. आता हे बंधारे उघडे केल्याने एरआता आणखी किमान सहा महिने तरी या बंधाऱ्यांकडे कोणी फिरकणार नाहीत.

संबंधित बातम्या