ISL: बंगळूरला ईस्ट बंगालचा धोका
ISL: East Bengal threat to Bangalore

ISL: बंगळूरला ईस्ट बंगालचा धोका

पणजी ः बंगळूर एफसी संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत धोकादायक ईस्ट बंगाल संघ त्यांना पुन्हा धक्का देऊ शकतो. सामना मंगळवारी वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल.बंगळूरला मागील लढतीत दोन गोलांच्या आघाडीनंतरही शेवटच्या चार मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे हैदराबादने बरोबरीत रोखले होते. ओडिशा एफसीनेही बंगळूरला बरोबरीत रोखले होते. अंतरिम मुख्य प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील या संघाची कामगिरी लौकिकास साजेशी नाही. सलग आठ सामने ते विजयाविना आहेत, तर 14 सामन्यांत त्यांनी तब्बल 19 गोल स्वीकारले आहेत.

कोलकात्याच्या ईस्ट बंगालने एफसी गोवाविरुद्धच्या खेळाची पुनरावृत्ती केल्यास बंगळूरला सामना जड जाऊ शकतो. एका गोलच्या पिछाडीवरून ईस्ट बंगालने मागील लढतीत एफसी गोवास गोलबरोबरीत रोखले होते. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने नऊ लढतीत फक्त एक सामना गमावला आहे. पहिल्या टप्प्यातही त्यांनी बंगळूरला हरविले होते. ईस्ट बंगालच्या आघाडीफळीस सूर गवसल्यास बंगळूरला बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना जड जाऊ शकते. बंगळूरच्या संघाने सलग ११ सामने क्लीन शीट राखलेली नाही.

बंगळूर एफसीचे 14 लढतीतून तीन विजय, सहा बरोबरी, पाच पराभव या कामगिरीसह 15 गुण आहेत. ईस्ट बंगालने 13 गुणांची कमाई करताना 14 लढतीत दोन विजय, सात बरोबरी, पाच पराभव अशी कामगिरी केली आहे.

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे ईस्ट बंगालची बंगळूरवर 1-0 फरकाने मात

- बंगळूर सलग 8 सामने विजयाविना, 3 बरोबरी, 5 पराभव

- बंगळूरचे 17, तर ईस्ट बंगालचे 12 गोल

- प्रतिस्पर्ध्यांचे बंगळूरवर 19, तर ईस्ट बंगालवर 18 गोल

- ईस्ट बंगालच्या 3, तर बंगळूरच्या 2 क्लीन शीट्स

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com