पणजीतील हातगाडेधारकांचा प्रश्‍न अद्याप अनुत्तरीतच !

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

विविध खाद्यपदार्थ विकणाऱ्या पणजीतील ९२ हातगाडेधारकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अस्वच्छतेच्या आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली हातगाडेधारकांना महापालिकेने घरचा रस्ता दाखवला आणि कोरोनामुळे या अनेक गाडेधारकांचे पूर्णतः कंबरडे मोडले गेले आहे. पुन्हा कधी व्यवसाय सुरू होणार, याची चिंता या गाडेधारकांना लागली आहे. 
 

पणजी :  विविध खाद्यपदार्थ विकणाऱ्या पणजीतील ९२ हातगाडेधारकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अस्वच्छतेच्या आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली हातगाडेधारकांना महापालिकेने घरचा रस्ता दाखवला आणि कोरोनामुळे या अनेक गाडेधारकांचे पूर्णतः कंबरडे मोडले गेले आहे. पुन्हा कधी व्यवसाय सुरू होणार, याची चिंता या गाडेधारकांना लागली आहे. 

राजधानीत डॉन बॉस्को विद्यालयाच्या पूर्वेला असलेल्या महापालिकेच्या जागेत पेव्हर्स घालून खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना जागा दिली होती. परंतु येथील १३ हातगाडेधारकांपैकी काहीजण रात्री उशिरापर्यंत थांबून व्यवसाय करीत आणि जाताना भांडी धुतलेले पाणी व खरकाटे गटारात टाकून जात. त्यामुळे गटारे तुंबल्याने या परिसरात दुर्गंधी वाढली आणि आजूबाजूच्या लोकांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यातून महापालिकेने कारवाई करीत हा व्यवसाय बंद केला, मिरामार येथील सायंकाळी लागणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांना तेथील जागेच्या सुशोभीकरणाचा फटका बसला. 

महापालिकेच्या काही मासिक सभांमध्ये हातगाडेधारकांचा मुद्दाही अनेकवेळा चर्चेला आला, पण त्यावर कायमचा उपाय निघाला नाही. महापौर उदय मडकईकर हे पहिल्यांदा महापौर झाले तेव्हा हातगाडेधारकांसाठी नव्या गॅलव्हेनाईजचे हातगाडे बँकेमार्फत देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांचा प्रस्ताव त्यांच्याजवळच राहिला.  हातगाडे बंद झाल्यानंतर या व्यावसायिकांनी महापालिकेकडे अनेकदा विनंती केली पण ते हातगाडे काही सुरू झाले नाहीत. हातगाडे सुरू होण्याची शक्यता कमी आहे. झालेच तर ते मिरामार येथील हातगाडेधारकांसाठी सुशोभित करण्यात येणाऱ्या जागेचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर. अन्यथा त्यांनाही काही महिने वाट पहावी लागणार आहे.

मासिक बैठकीत चर्चा
पुढील महिन्यात होणाऱ्या मासिक बैठकीत गाडेधारकांचा विषय निकाली काढण्यासाठी चर्चा होईल. हा विषय आपण स्वतः  अजेंड्यावर ठेवणार आहोत. अनेकांना या बंदीमुळे आणि कोरोनामुळे बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले आहेत. काही अटी, शर्ती घालून गाडेधारकांना पुन्हा व्यवसाय सुरू कसा करता येईल, याकरिता नगरसेवकांची मतेही जाणून घेतील जातील, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या