शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर

शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर
It is best invest only after the correction Technical Analyst Kiran Jadhav

पुणे: शेअर बाजारातील सध्याची तेजी पाहिली तर या बाजाराचे मूल्यांकन महाग वाटते. शेअर बाजाराने सर्वसाधारणपणे तेजीचे संकेत दिले असले तरी ‘करेक्शन’नंतरच गुंतवणूक करणे योग्य ठरेल, असे मत प्रसिद्ध टेक्निकल ॲनालिस्ट किरण जाधव यांनी आज व्यक्त केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ मनी’ या अर्थ-उद्योग-गुंतवणूक विश्वाला वाहिलेल्या नावीन्यपूर्ण दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 


यावेळी या दिवाळी अंकाचे प्रायोजक असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप सोसायटीचे सुशील जाधव; तसेच ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, निवासी संपादक रमेश डोईफोडे, ‘सकाळ मनी’चे व्यवसायप्रमुख रोशन थापा आदी उपस्थित होते. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हेही या अंकाचे प्रायोजक आहेत.  शेअर बाजाराविषयी बोलताना किरण जाधव म्हणाले, की सध्याचे मूल्यांकन पाहिले तर बाजार महाग वाटतो. त्यामुळे गुंतवणुकीआधी ‘करेक्शन’ची वाट पाहायला हवी. ‘निफ्टी’ घसरून जास्तीतजास्त १०,८०० अंशांच्या पातळीपर्यंत येऊ शकतो.

या दिशेने घसरण होत असताना टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकते. आगामी दहा वर्षे ही तेजीचीच असून, मधल्या काळात काही ना काही कारणाने चढ-उतार दिसतीलही, पण अशी अधूनमधून होणारी घसरण ही खरेदीचीच संधी असेल. आगामी २०२८ पर्यंत ‘सेन्सेक्स’ किमान एक लाख अंशांचा टप्पा ओलांडून जाऊ शकतो. हा आकडा म्हणजे अतिशयोक्ती नाही, असेही त्यांनी नमूद केले. यापुढील काळात आयटी, फार्मा, कन्झम्प्शन आणि बँकिंग ही क्षेत्रे लक्षवेधक ठरतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक मुकुंद लेले यांनी दिवाळी अंकामागची भूमिका स्पष्ट केली, तर सुवर्णा-येनपुरे-कामठे हिने आभार मानले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com